‘त्यांनी’ नऊ लाख रुपयांची होंडा मोटार खरेदी केली, तेव्हा त्यांना छान वागणूक मिळाली. अनेक आश्वासने देण्यात आली. पण काहीच दिवसांत त्यांच्या मोटारीला अपघात झाला अन् सारे चित्रच बदलले.. सर्व सेवा मोफत असतील असे सांगणाऱ्या विमा कंपनीने अपघातग्रस्त मोटार बाजूला करण्यासाठी पाच हजार रुपये मागितले. होंडा कंपनीच्या वितरकाने खर्चाचे ‘एस्टिमेट’ देण्यासाठी ९० हजारांची मागणी केली. मोटार आपल्या आवारात उभी केली म्हणून पाच-सात हजार रुपये ‘पार्किंग चार्जेस’ देण्यास सांगितले.. या त्रासामुळे हैराण झालेल्या ग्राहकाची ही कहाणी.. मात्र, त्याला ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांची साथ लाभल्याने सुखांत ठरलेली!
राहुल रामचंद्र कदम यांना या मनस्तापाला सामोरे जावे लागले. त्यांनी चिकाटी ठेवून लढा दिला. त्यांना ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते विलास लेले यांनी सर्व प्रकारची मदत केली. त्यामुळे त्यांना ही अडवणूक रोखणे शक्य झाले.
कदम यांनी या प्रकरणाची कागदपत्रे ‘लोकसत्ता’ला उपलब्ध करून दिली आहेत. स्वत: कदम व लेले यांनी याबाबत माहिती दिली. कदम यांनी विमाननगर येथील ‘क्रिस्टल होंडा कोठारी अॅटोलिंक’ या वितरकाकडून जून २०१३ मध्ये होंडा अमेझ ही मोटार खरेदी केली. ती घेताना वितरकांच्या सांगण्याप्रमाणे ‘कॅरलेन रेड’ या विशिष्ट रंगासाठी सात हजार पाचशे रुपये जादा दिले. तसेच त्यांच्याच सूचनेप्रमाणे नॅशनल इन्शुरन्सच्या विम्यासाठी वर्षांचा हफ्ताही भरला. हा विमा ‘फुल प्रेफ्रेन्सिव्ह’ असल्यामुळे गाडीला अपघात झाल्यास दुरुस्तीसाठी एकही पैसा भरावा लागणार नव्हता. मोटारीला काही अपघात झाल्यास अपघातग्रस्त मोटार उलचून नेण्याचे काम विमा कंपनी करेल, असे कंपनीकडून कदम यांना लेखी देण्यात आले होते.
कदम यांच्या मोटारीला ९ सप्टेंबर २०१३ रोजी रांजणगाव येथे अपघात झाला. या अपघातामध्ये त्यांच्या मोटारीचे मोठे नुकसान झाले. मोटारीला अपघात झाल्यानंतर कदम यांनी विमा कंपनीशी संपर्क साधला. त्या वेळी सुरुवातीला त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तुम्ही अशा कोणत्याही प्रकारचा विमा घेतलेला नाही, असे सांगण्यात आले. मोटार उचलण्यास पाच हजार रुपये खर्च येईल असे सांगितले. त्यामुळे विमा कंपनीच्या भरवशावर न राहता कदम यांना खासगी क्रेन भाडय़ाने आणून गाडी रस्त्यातून बाजूला घ्यावी लागली. त्यासाठी पाच हजार रुपये खर्च सोसावा लागला. त्यांनी मोटार सूस रस्त्यावरील होंडा कंपनीच्या सव्र्हिस सेंटरमध्ये नेली. विम्याची रक्कम मिळवण्यासाठी कदम यांना मोटारीचे नुकसान झाल्याचे ‘एस्टिमेट’ हवे होते. मोटारीचे झालेले नुकसान पाहून सव्र्हिस सेंटरच्या प्रतिनिधीने ते सांगणे अपेक्षित होते. मात्र, त्यासाठी कदम यांच्याकडे तब्बल ९० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. इतकेच नव्हे तर त्यांची मोटार सव्र्हिस सेंटरच्या आवारात काही दिवस उभी राहिली म्हणून त्यांच्याकडून सहा ते सात हजार ‘पार्किंग चार्जेस’ मागितले. मोटार खरेदी करताना या बाबी सांगण्यात आल्या नव्हत्या. कदम यांनी तशी विचारणा केली तेव्हा त्यांना सांगण्यात आले की, की कंपनीचे वितरण, सेवा, विक्री असे वेगवेगळे भाग आहेत, त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.
नव्या मोटारीचा अपघात आणि त्यानंतर हा मनस्ताप यामुळे कदम वैतागले होते. त्या वेळी त्यांना ग्राहक पंचायतीची माहिती मिळाली. त्यांनी पंचायतीचे उपाध्यक्ष विलास लेले यांच्याशी संपर्क साधला. लेले यांनी कदम यांना याबाबत सविस्तर पत्र देऊन सव्र्हिस सेंटरच्या मालकाला भेटायला सांगितले. त्यानुसार कदम हे मालकाला भेटले. मात्र, त्यांनीही कमीत कमी ३५ हजार रुपये भरण्यास सांगितले.. अखेरचे शस्त्र म्हणून लेले यांनी याबाबत ग्राहक न्याय मंचाकडे तक्रार देण्याचा इशारा दिला. तेव्हा मग कदम यांना ‘एस्टिमेट’ मिळाले, तेसुद्धा एकही पैसा न देता. पुढे विम्याची रक्कम त्यांच्या हाती लागली.. मात्र, इतक्या मनस्तापातून गेल्यावर!
मोटार नऊ लाखांची अन्
दुरुस्ती खर्च १८ लाख ५० हजार
कदम यांनी ९ लाख पाच हजार रुपयांना मोटार खरेदी केली होती. अपघातानंतर तिच्या दुरुस्तीसाठी १८ लाख ५० हजार रुपये खर्च येईल, असे सांगणारे ‘एस्टिमेट’ वितरकाकडून देण्यात आले. ते देताना दुरुस्ती खर्चाच्या पाच टक्के इतकी रक्कम ग्राहकाकडून ‘एस्टिमेट चार्जेस’ म्हणून घेतली जाते. त्यासाठीच कदम यांच्याकडे ९० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती, अशी माहिती विलास लेले यांनी दिली. ‘‘असे चार्जेस घेण्याबाबत कोणताही कायदा-नियम नाही, उलट असे पैसे उकळणे ही ग्राहकांची निव्वळ फसवणूक आहे,’’ असे लेले यांनी सांगितले.
.
‘एस्टिमेटसाठी खर्च येतोच’
‘‘कदम यांनी आमच्याकडून मोटार विकत घेतली होती. अपघातानंतर ते आमच्याकडे आले. ते आमच्याकडे मोटार दुरुस्त करणार नसतील तर त्यांना एकूण एस्टिमेटच्या पाच टक्के रक्कम चार्जेस म्हणून द्यावी लागेल, याची कल्पना कदम यांना दिली होती. त्यासाठीच्या अटींवरही त्यांनी सही केली होती. एस्टिमेट तयार करण्यासाठी कुशल कारागीर लागतात. त्यामुळे ग्राहकाकडून पैसे घ्यावे लागतात. कदम यांना विमा कंपनीकडून जास्तीत जास्त सात लाख रुपये मिळू शकतात, याचा विचार करून आम्ही त्यांच्याकडून कमी रक्कम घेण्याचे ठरवले होते. आमचे एस्टिमेट १८ लाख रुपयांचे झालेले असतानाही त्यांच्याकडून सात लाख रुपयांवर पाच टक्के (३५ हजार रुपये) रक्कम घेण्याचे मान्य केले होते. ही रक्कमही त्यांनी दिली नाही.
मोटारीच्या सुटय़ा भागांनुसार तिची किंमत केली, तर ती मूळ किमतीपेक्षा जास्त होते. त्यामुळेच मोटरीच्या नुकसानीचे एस्टिमेट मूळ किंमतीपेक्षा जास्त झाले होते.’’
– कौस्तुभ कोठारी
(संचालक, क्रिस्टल होंडा कोठारी अॅटोलिंक)
संग्रहित लेख, दिनांक 27th Dec 2013 रोजी प्रकाशित
मनस्ताप.. एक ‘एस्टिमेट’ मिळवण्यासाठी!
कदम यांनी ९ लाख पाच हजार रुपयांना मोटार खरेदी केली होती. अपघातानंतर तिच्या दुरुस्तीसाठी १८ लाख ५० हजार रुपये खर्च येईल, असे सांगणारे ‘एस्टिमेट’ वितरकाकडून देण्यात आले.

First published on: 27-12-2013 at 03:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Estimate honda rahul kadam headache