पुणे: शहरातील रस्त्यांची दुरस्ती करण्यासाठी २१७ कोटींचा खर्च अपेक्षित असून त्याबाबतच्या खर्चाला महापालिकेच्या पूर्वगणन समितीने (इस्टिमेट कमिटी) मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत रस्ते पूर्ववत करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. शहरात १ हजार ४०० किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. शहरात यंदा झालेल्या जोरदार पावसामुळे आणि सातत्याने रस्त्यांची खोदाई केल्याने रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली. एक हजार ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांपैकी एक हजार २०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे चित्र पुढे आले होते. त्यामुळे शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेकडून शहरातील १३० रस्त्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यानुसार आता रस्ते पूर्ववत करण्यासाठी पहिल्या टप्प्यात २०० पेक्षा जास्त रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असून येत्या काही दिवसांत ५५ प्रमुख रस्त्यांची डागडुजी करण्यात येणार आहे. त्यासाठी २१७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्याला पूर्वगणन समितीने मान्यता दिली आहे. सातारा रस्ता ते केके मार्केट, दत्तनगर चौक ते भूमकर चौक, नीलायम चित्रपटगृह ते दांडेकर पूल चौक, धायरी गाव ते सिंहगड सेवा रस्ता, कर्वेनगर गावठाण ते सहवास सोसायटी, कमिन्स महाविद्यालय ते कर्वेनगर, नेहरू रस्ता, टिळक रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्त्यांचा पहिल्या टप्प्यातील कामांमध्ये समावेश आहे.
महापालिकेच्या पथ विभागाच्या अभियंत्यांसह महापालिकेने रस्त्यांच्या गुणवत्तेसाठी नेमलेल्या एका सल्लागार कंपनीच्या माध्यमातून रस्त्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये किमान १३० रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याचा अहवाल प्रशासनाला देण्यात आला आहे. शहरामध्ये १२ मीटरपेक्षा जास्त असे ४०० किलोमीटरचे रस्ते आहेत, तर एक हजार किलोमीटरचे रस्ते हे १२ मीटरपेक्षा कमी आहेत. खड्डे भरणे, काही ठिकाणी नव्याने काँक्रीट करणे, पदपथांची दुरुस्ती, रस्त्यावरील पेव्हर ब्लॉक बदलणे अशी कामे याअंतर्गत करण्याचे प्रस्तावित आहे. शहरातील आठ लाख ५७ हजार चौरस मीटर रस्त्यांची दुरुस्ती करण्याचेही प्रस्तावित आहे.