पुणे : देशभरात जून महिन्यात पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाची पातळी उच्चांकी १५.९० टक्क्यांवर गेली आहे. नोव्हेंबर २०२३ ते जून २०२४ या काळातील एकूण इथेनॉल मिश्रण पातळी सरासरी १३ टक्के इतकी राहिली. केंद्रीय पेट्रोलिअम मंत्रालयाच्या पेट्रोलिअम नियोजन आणि विश्लेषण विभागाच्या जून महिन्याच्या मासिक अहवालानुसार, देशात जून महिन्यातील पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाची पातळी आजवरची सर्वाधिक १५.९० टक्क्यांवर गेली आहे. तर नोव्हेंबर २०२३ ते जून २०२४ या काळातील इथेनॉल मिश्रण पातळी सरासरी १३ टक्क्यांवर गेली आहे.
एक जुलैअखेर देशातील एकूण ८१,९६३ पेट्रोल पंपांपैकी १४,४७६ पेट्रोल पंपांवरून इथेनॉलमिश्रित पेट्रोलची विक्री सुरू आहे. नोव्हेंबर २०२३ ते जून २०२४ या काळात ४०१ कोटी लिटर इथेनॉल मिश्रण केंद्रांवर संकलित झाले आहे, तर याच काळात ४१४.४ कोटी लिटर इथेनॉलचे पेट्रोलमध्ये मिश्रण करण्यात आले आहे. २०२०-२१मध्ये मिश्रण प्रमाण ८.१ टक्के होते. २०२०-२२मध्ये १० टक्के, डिसेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२३ या काळात १२.१० टक्के मिश्रण पातळी गाठण्यात यश आले होते.
हेही वाचा…गडचिरोलीमध्ये घबाड सापडले आहे….
मक्यापासून इथेनॉल निर्मितीवर भर
केंद्र सरकारने २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठण्यासाठी मक्यापासून इथेनॉल निर्मितीला चालना दिली आहे. भारतीय मका संशोधन संस्थेच्या माध्यमातून मका उत्पादन वाढवण्यासाठी महाराष्ट्रासह १५ राज्यांतील शेतकऱ्यांना सुधारित मका वाणाचे बियाणे वितरित केले आहे. शेतकरी, उत्पादक कंपन्या, डिस्टिलरी आणि बियाणे उद्योग यांना एकत्र आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पंधरा राज्यांमध्ये पंधरा क्लस्टर तयार करण्यात आले असून, त्यांमध्ये देशभरातील ७८ जिल्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, आसाम, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, तेलंगणा, तमिळनाडू, केरळ, उत्तराखंड, कर्नाटक आणि हरियाणा या १५ राज्यांत मक्याच्या उत्पादन वाढीसाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा…पिंपरी : अजित पवारांना मोठा धक्का! शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष यांचा राजीनामा
केंद्र सरकारकडून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाला चालना दिली जात आहे. देशभरातील सर्व पेट्रोल पंपांवर इथेनॉलमिश्रित पेट्रोल विक्रीचे आदेश आहेत. २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट आहे. – अली दारुवाला, प्रवक्ता, ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन (एआईपीडीए)