पुणे : देशाची वार्षिक इथेनॉल उत्पादनक्षमता १५८९ कोटी लिटरवर गेली आहे. त्यात प्रामुख्याने ऊस, मका, खाण्यायोग्य नसलेले तांदूळ, गहू, विविध प्रकारचा टाकाऊ कचरा आणि गवतासह अन्य कृषी कचऱ्यापासून इथेनॉलनिर्मिती प्रकल्पांचा समावेश आहे.
केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न तथा सार्वजनिक वितरण आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘देशाची इथेनॉल उत्पादनक्षमता १,५८९ कोटी लिटरपर्यंत वाढली आहे. त्यामुळे देशांतर्गत इथेनॉलची गरज सहजपणे भागवू शकतो. एकूण इथेनॉल उत्पादनात साखर कारखान्यांमध्ये उत्पादित झालेल्या इथेनॉलचा वाटा आजवर सर्वाधिक होता. आता अन्नधान्यापासून उत्पादित इथेनॉलचे प्रमाण वाढले आहे. मक्यापासून इथेनॉलनिर्मितीने गती घेतली आहे.’
हेही वाचा – मनोरमा खेडकर यांना जामीन मंजूर, मुळशी तालुक्यात जाण्यास न्यायालयाची मनाई
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड: झिका आजाराचे आढळले दोन रुग्ण; डेंग्यूचे ३९
जून २०२४ मध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉलची मिश्रण पातळी १५.९० टक्क्यांवर गेली आहे. नोव्हेंबर २०२३ – जून २०२४ दरम्यान एकत्रित इथेनॉल मिश्रण पातळी १३ टक्क्यांवर गेली आहे. २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. हे साध्य करण्यासाठी अंदाजे १०१६ कोटी लिटर इथेनॉल आवश्यक आहे, त्यासह अन्य वापरासाठी मिळून एकूण इथेनॉलची गरज १३५० कोटी लिटर आहे. इथेनॉल प्रकल्प आपल्या उत्पादन क्षमतेच्या सरासरी ८० टक्के क्षमतेने इथेनॉलनिर्मिती करीत असल्यामुळे २०२५ पर्यंत सुमारे १७०० कोटी लिटर इथेनॉल उत्पादनक्षमता आवश्यक आहे. दरम्यान, डिसेंबर २०२३ मध्ये देशाची इथेनॉलनिर्मितीची क्षमता १३८० कोटी लिटर इतकी होती. त्यापैकी उसापासून ८७५ कोटी लिटर आणि धान्यापासून ५०५ कोटी लिटर क्षमता होती.