पुणे : ऊस, अन्नधान्याच्या पाठोपाठ आता बटाट्यापासून इथेनॉल निर्मिती केली जाणार आहे. शिमला येथील केंद्रीय बटाटा संशोधन संस्थेने (सीपीआरआय) या बाबतचा यशस्वी प्रयोग केला आहे. संस्थेच्या वतीने इथेनॉल उत्पादनासाठी फायदेशीर ठरणारे नवे वाण विकसित करणार असून, त्यादृष्टीने संशोधन सुरू आहे.
‘सीपीआरआय’च्या जैवरसायन आणि काढणीपश्चात तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. दिनेश कुमार आणि त्यांचे सहकारी डॉ. धर्मेंद्र कुमार यांनी जैव इंधन, इथेनॉल निर्मितीसाठी पोषक ठरणाऱ्या निवडक बटाटा वाणांवर संशोधन करून नवे वाण विकसित करण्याचे काम सुरू केले आहे. पण, सीपीआरआय नवे वाण विकसित करेपर्यंत खाण्यायोग्य नसलेल्या, खराब बटाट्यापासून इथेनॉल तयार करणार आहे. देशात उत्पादित होणाऱ्या एकूण बटाट्यांपैकी १५ टक्के बटाटा विविध कारणांमुळे खराब होतो. हा बटाटा सध्या टाकून द्यावा लागत आहे. या टाकाऊ बटाट्यांपासून इथेनॉल निर्मिती केली जाणार आहे.
हेही वाचा – सोयाबीननंतर मूगही कवडीमोल, राज्यातील बाजार समित्यांमध्ये किती दर ?
‘सीपीआरआय’ने बटाट्यापासून इथेनॉल निर्मितीचा यशस्वी प्रयोग केला आहे. सध्या खाण्यायोग्य नसलेल्या, सडलेल्या बटाट्यापासून इथेनॉल निर्मिती करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सडलेल्या बटाट्याचेही चांगले पैसे मिळतील. लवकरच इथेनॉल निर्मितीसाठी फायदेशीर ठरेल असे नवे वाण विकसित करू, असे केंद्रीय बटाटा संशोधन केंद्राचे महासंचालक डॉ. ब्रजेश सिंह यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – राज्यात पावसाचा जोर कमी होणार ? जाणून घ्या, गुजरातमध्ये मुसळधार आणि राज्यात उघडीप का ?
इथेनॉल निर्मिती क्षमता, ६०० कोटी लिटरने वाढणार
केंद्र सरकारकडून इथेनॉल निर्मितीवर भर देण्यात येत आहे. त्यामुळे नोव्हेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२५, या काळात देशाची इथेनॉल उत्पादन क्षमता ६०० कोटी लिटरने वाढण्याचा अंदाज क्रिसिल रेटिंग कंपनीने वर्तविला आहे. यंदा मोसमी पाऊस देशात सर्वदूर चांगला बरसला आहे. त्यामुळे ऊस, अन्नधान्यांच्या उत्पादनात चांगली वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ऊस, अन्नधान्य आधारित इथेनॉल उत्पादनातही वाढ होण्याचा अंदाजही क्रिसिलने व्यक्त केला आहे.