अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी परदेशी गेलेल्या चार तरुणांनी एकत्र येत सॉफ्टवेअर, संकेतस्थळ विकसित करणारी कंपनी २०११ मध्ये सुरू केली. माहिती तंत्रज्ञान आणि विपणन ही दोन क्षेत्रे डोळ्यासमोर ठेवून काम सुरू करण्यात आले. मुंबई, पुणे, सोलापूर अशा विविध शहरांमधून संगणकीय व्यवस्थापन प्रणाली, मोबाइल अॅप, संकेतस्थळ विकसित करण्याची कामे कंपनीला मिळत गेली. याबरोबरच परदेशातील अनेक प्रकल्पांवर कंपनी काम करत आहे.
अमोल जोशी, अचल पटेल, हर्षुल पटेल आणि पूजा जोशी यांनी एकत्र येत फेब्रुवारी २०११ मध्ये ईवा सोल्युशन्स प्रा. लि. या कंपनीची स्थापना केली. मागणी येईल त्यानुसार कंपनीकडून संगणक प्रणाली, संकेतस्थळ, संगणकीय व्यवस्थापन प्रणाली, मोबाइल अॅप तयार करून दिले जाते. माहिती तंत्रज्ञान आणि विपणन ही दोन मूळ क्षेत्रे डोळ्यासमोर ठेवून काम सुरू करण्यात आले. याबरोबरच डिजिटल मार्केटिंग, स्पोर्ट्स अॅकॅडमी या क्षेत्रातही कंपनी कार्यरत आहे.
चौघांनी मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते परदेशी गेले. शिक्षणानंतर नोकरी करत असतानाच सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपनी सुरू करावी अशी कल्पना चौघांच्या विचारविनिमयातून पुढे आली आणि ईवा सोल्युशनची स्थापना झाली. कंपनी स्थापन केली तेव्हा विविध कंपन्या, शासकीय प्रकल्पांमध्ये संगणक प्रणाली वापरण्यास नुकतीच सुरुवात झाली होती. हर्षुल अमेरिकेत असल्याने त्यांच्या ओळखीने पहिल्या सहा महिन्यांतच अमेरिकेतील एका कंपनीकडून डेव्हलपमेंट अॅण्ड सपोर्ट प्रणालीचे काम कंपनीला मिळाले. व्यवसाय सुरू केल्यानंतर पहिली काही वर्षे खडतर होती. कर्मचारी नियुक्त करून त्यांना पगार देण्याएवढी कंपनीची आर्थिक परिस्थिती नसल्याने अमोल, अचल, पूजा आणि हर्षुल यांनीच सुरुवातीच्या प्रकल्पांवर काम केले.
कंपनीचे कामकाज अमोल, अचल, पूजा आणि हर्षुल असे चौघे मिळून पाहतात. पुणे, सोलापूर आणि अमेरिकेत कंपनीने शाखा विस्तारल्या आहेत. अमेरिकेची शाखा हर्षुल, तर पुणे व सोलापुरातील शाखा अमोल, पूजा आणि अचल पाहतात. तीनही शाखा मिळून तीस कर्मचारी आहेत. कंपनी सुरू केल्यानंतर इन्क्युबेशन सेंटर स्थापन करून त्या अंतर्गत विविध विभाग सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यानुसार सहा वर्षांच्या खडतर प्रयत्नांनंतर माहिती तंत्रज्ञान, विपणन, अॅड ऑपरेशन्स आणि स्पोर्ट्स हे विभाग कार्यान्वित करण्यात आले. माहिती तंत्रज्ञानांतर्गत संकेतस्थळ, ई-कॉमर्स संकेतस्थळ, मोबाइल अॅप विकसित करण्याचे विभाग आहेत. विपणन क्षेत्रांतर्गत लीड जनरेशन, कॉन्टॅक्ट जनरेशन आणि डिजिटल मार्केटिंग असे विभाग आहे. अॅड ऑपरेशन अंतर्गत अॅनालिटिक रिपोर्टिग, अॅड कॅम्पेन मॅनेजमेंट असे विविध विभाग आहेत. स्पोर्ट्स अंतर्गत लहान मुलांना प्रशिक्षण आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी जिम्नॅशिअमचे प्रशिक्षण असे विभाग आहेत.
अमेरिकेत माहिती तंत्रज्ञान क्षेत्राबाबतचा एनवायसी टेक नावाचा फेस्टिव्हल आयोजित केला जातो. त्या फेस्टिव्हलमध्ये कंपनीच्या ‘डॅश’ नावाच्या अॅप्लिकेशनची नॅसडॅक नावाच्या नामांकित समूहाने दखल घेतली आहे. पुण्यातील किलरेस्कर ब्रदर्स कंपनीची संगणकीय व्यवस्थापन प्रणाली कंपनीने तयार करून दिली आहे. याबरोबरच दूरसंचार क्षेत्रातील आयडिया कंपनीसोबत हवामानाचा अंदाज घेण्याबाबतच्या क्लायमासेल नावाच्या प्रकल्पावर कंपनी काम करत आहे. पुण्यातील बाणेर, पाषाण, बालेवाडी, कोथरूड, लष्कर अशा विविध भागांमधील आस्थापनांना संकेतस्थळ, मोबाइल अॅप विकसित करून देण्यात आले आहेत. सोलापुरातील नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (एनटीपीसी) या केंद्र सरकारच्या कंपनीच्या प्रकल्पाचेही काम ईवा सोल्युशन्सकडून सुरू आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करत असतानाच कंपनीने सामाजिक भानही जपले आहे. गणेशोत्सव, नवरात्रात चतु:शृंगी मंदिरात अहोरात्र कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना कंपनीकडून सुविधा दिल्या जातात. त्याबरोबरच पूजा या राष्ट्रीय स्तरावरील जिम्नॅशिअम परीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्या माध्यमातून पुण्यातील महाराष्ट्र मंडळात विद्यार्थ्यांना जिम्नॅशिअमचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. बारा ते अठरा वयोगटातील विद्यार्थ्यांची ऑलिम्पिकसारख्या स्पर्धाची तयारी घेतली जाते.
prathamesh.godbole@expressindia.com