पुणे : दरोडा घालण्याच्या तयारीत असताना नेपाळमधील एका तरुणाला अटक करण्यात आली. या गुन्ह्यात त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर सहा वर्षे १० महिने कारागृहात घालवावे लागले. पुणे जिल्हा विधी प्राधिकरणाच्या लोक अभिरक्षक कार्यालयाने याबाबत पाठपुरावा केला. न्यायालयात अर्ज केल्यानंतर तरुणाची मुक्तता करण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी याबाबतचे आदेश नुकतेच दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राकेश थापा याला दरोडा घालण्याच्या तयारीत असताना अटक करण्यात आली होती. थापा मूळचा नेपाळचा आहे. न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. त्याने जामिनासाठी अर्जदेखील केला होता. त्यानुसार न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. मात्र, जामिनासाठी ठेवण्यात आलेल्या अटींची पूर्तता थापा याने केली नव्हती. त्यामुळे तो सहा वर्षे १० महिने आणि १३ दिवस कारागृहात राहिला.

हेही वाचा – डॉक्टरांची कमाल! रुग्णाला शुद्धीवर ठेवून गुंतागुंतीची मेंदू शस्त्रक्रिया

याबाबतची माहिती लोक अभिरक्षक कार्यालयाला मिळाली. त्यानंतर थापाच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्यात आले. याबाबतचा अर्ज प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोक अभिरक्षक कार्यालयाचे वकील ॲड. एन. एच. शेख आणि ॲड. मदन कुऱ्हे यांनी दाखल केला. सुनावणी दरम्यान थापा याने गुन्हा कबूल केला. गुन्ह्यासाठी असलेली शिक्षा आणि थापाने भोगलेली शिक्षा या बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा – पुणे : नेट-सेट, पीएच.डी धारक रस्त्यावर; सत्याग्रहाला सुरुवात

थापा याचा जामीन मंजूर झाला आहे. मात्र, जामिनाच्या अटींची पूर्तता न केल्याने तो सहा वर्षे १० महिने आणि १३ दिवस कारागृहात आहे. जामीन मिळणे आणि कारागृहातून सुटका होणे हा त्याचा कायदेशीर हक्क आहे. नैसर्गिक न्यायानुसार त्याला न्याय मिळणे गरजेचे आहे. आरोपीने भोगलेली शिक्षा आणि न्यायालयापुढे सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्याची कायमस्वरुपी सुटका करण्यात यावी, असा युक्तिवाद ॲड. शेख आणि ॲड. कुऱ्हे यांनी केला. न्यायालयाने युक्तीवाद ग्राह्य धरून थापा याची सुटका केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Even after being granted bail the youth from nepal remained in jail for six years and 10 months pune print news rbk 25 ssb
Show comments