लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : शहरातील नागरिकांना समान पाणी मिळावे, यासाठी सात वर्षापूर्वी सुरू झालेल्या समान पाणीपुरवठा योजनेचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. या योजनेवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केल्यानंतरही ही योजना पूर्ण होत नसल्याने हे प्रशासनाचे अपयश असल्याची टीका सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली. या योजनेला वारंवार मुदतवाढ दिल्यानंतरही आतापर्यंत या योजनेचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित २० टक्के काम पूर्ण होण्यासाठी पुढील काही वर्षांची वाट पहावी लागणार असल्याचे वेलणकर यांनी सांगितले. ‘समान पाणी पुरवठा योजनेसाठी आवश्यक त्या पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी तत्कालीन केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून महापालिकेला २५० कोटी रुपयांचा निधी मिळाला होता.

फेब्रुवारी २०१८ मध्ये टाक्यांच्या कामाला सुरुवात झाली. सात वर्षे झाल्यानंतर एकूण ८६ टाक्यांपैकी सहा वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही केवळ ६० टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. या सर्व टाक्यांचे काम पूर्ण होण्यास अजून दोन वर्षे लागतील,’ असे वेलणकर म्हणाले.

या योजनेच्या माध्यमातून शहरातील मध्यवर्ती भागातील पेठांमधील काम दोन वर्षांपूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते. या योजनेत पाण्याच्या वापरावर बंधन यावे, पाण्याचा अपव्यय थांबावा यासाठी पाण्याचे मीटर बसविले जात आहे. पेठांमध्ये मीटरचे केवळ ६७ टक्के काम पूर्ण झाले असून, पाइपलाइन चे काम ८४ पूर्ण झाले आहे. तर, लोहगाव, धानोरी , कळस, वारजे तसेच शहरातील इतर भागांमध्ये पाण्याचे मीटर बसविण्याचे काम ९० ते ९५ टक्के पूर्ण झाले आहे. यासाठीही मुदतवाढ घेण्याची तयारी महापालिका प्रशासनाने सुरू केली असल्याचे वेलणकर यांनी सांगितले.

समान पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी आतापर्यंत दीड हजार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. मूळ कंत्राटाप्रमाणे या प्रकल्पाचे काम मार्च २०२२ मध्येच संपणे अपेक्षित होते. मात्र, हे काम आजही रखडले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या करातून जमा होणाऱ्या निधीतून या योजनेचे काम केले जात आहे. या योजनेवर पाण्यासारखा पैसा खर्च होऊनही सात वर्षांपासून ही योजना रखडलेलीच असल्याची टीका विवेक वेलणकर यांनी केली.

शहरातील विविध भागात राहणाऱ्या नागरिकांना समान आणि सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, या उद्देशाने महापालिकेने सात वर्षापूर्वी ही योजना प्रस्तावित केली होती. सुरुवातीच्या काळात या योजनेचे नाव ‘२४ बाय ७ पाणीपुरवठा ‘ असे ठेवण्यात आले होते. मात्र ते शक्य होणार नाही, असे लक्षात आल्यानंतर योजनेचे नाव बदलून समान पाणीपुरवठा योजना असे करण्यात आले. मात्र सात वर्षानंतर ही योजना पूर्णत्वाला न आल्याने ही योजना पूर्ण होण्यासाठी अजून किती काळ लागणार, अशी विचारणा नागरिकांकडून केली जात आहे.

Story img Loader