खऱ्या अर्थाने लोकाभिमुख विचारवंत प्रा. राम बापट यांचे ज्ञान, प्रतिभा आणि त्यांचे कार्य कोणत्याही एका विशिष्ट क्षेत्राच्या परिघात मर्यादित नव्हते. औपचारिक शिक्षण आणि व्यवसायाने ते राज्यशास्त्रज्ञ असूनही त्यांचा कार्यविस्तार तत्त्वज्ञान, समाजशास्त्र,, साहित्य, कला, नाटय़, चित्रपट, सामाजिक आणि राजकीय चळवळी, दृश्यकला अशा बहुविध क्षेत्रांना स्पर्श करणारा होता. प्रा. बापट यांच्याविषयी वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी नाटककार मकरंद साठे आणि गजानन परांजपे या नाटय़ आणि साहित्यकर्मीनी २०१३ पासून प्रा. राम बापट स्मृती व्याख्यानमाला सुरू केली. या मालेतील यंदाचे पुष्प गुंफणार आहेत भारतातील एक महत्त्वाचे कवी, समीक्षक, द्वैभाषिक संपादक आणि विचारवंत के. सच्चिदानंदन. ‘कविता, आधुनिकता आणि प्रतिकार’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. एस. एम. जोशी सभागृह येथे शनिवारी (३० जुलै) सायंकाळी साडेसहा वाजता हे व्याख्यान होणार आहे. ‘पोस्ट स्ट्रॅटेजिकल पोएट्री’ या विषयावर के. सच्चिदानंदन यांनी डॉक्टरेट केली आहे. साहित्य अकादमीचे प्रमुखपद त्यांनी भूषविले आहे.
जलरंगातील प्रात्यक्षिके
कलाछाया संस्थेतर्फे सुरू असलेल्या ‘आर्ट मीट’ चित्रप्रदर्शनात सुरेश पेठे हे जलरंगातील प्रात्यक्षिके शनिवारी (३० जुलै) सादर करणार आहेत. पत्रकारनगर रस्त्यावरील दर्पण आर्ट गॅलरी येथे सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
सुनहरी यादे
सुरेल स्वरांचे पाश्र्वगायक महंमद रफी यांच्या ३६ व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून त्यांच्या लोकप्रिय गीतांवर आधारित ‘सुनहरी यादे’ हा कार्यक्रम तुषार त्रिवेदी आणि सहकारी सादर करणार आहेत. पुणे बँग्ज मॅन्युफॅक्चरर होलसेल अँड रिटेल असोसिएशनतर्फे मालधक्का चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे रविवारी (३१ जुलै) रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
‘रंग वर्षां’ चित्रप्रदर्शन
‘नेमेची येतो मग पावसाळा’ असे आपण म्हणत असलो तरी प्रत्येकाला पाऊस हा हवाहवासा वाटतो. पाऊस हा मातीतून सर्जन घडवितो. तसा तो कलाकारालाही नवसर्जनासाठी उद्युक्त करतो. गणेश कर्पे, राहुल भालेराव आणि शैलेश व्हावळ या तीन मित्रांचे पारंपरिक शैली आणि नयनरम्य रंगांची मेजवानी असलेले ‘रंग वर्षां’ हे चित्रप्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे भरविले आहे. रविवापर्यंत (३१ जुलै) सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले असेल. गणेश कर्पे हे
व्यावसायिक चित्रकार असून त्यांनी यापूर्वी विविध चित्रप्रदर्शनांमध्ये सहभाग घेतला आहे. शैलेश व्हावळ हे हस्तकला शिक्षक असून ते भारतीय शैलीतील कलाकुसर असलेली चित्रे सादर करतात. राहुल भालेराव हे कलाशिक्षक असून त्यांनी तैलरंग आणि अॅक्रॅलिक माध्यमातील चित्रे आणि व्यक्तिचित्रे चितारली आहेत.
प्रकाश कर्दळे स्मृती व्याख्यान
जनमानसाची नाडी अचूकपणे पकडणारे ज्येष्ठ पत्रकार आणि ‘द इंडियन एक्सप्रेस’चे माजी संपादक प्रकाश कर्दळे स्मृती व्याख्यान यंदा माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी वाय. पी. सिंह गुंफणार आहेत. ‘व्हाय आर ऑनेस्ट गव्हर्नमेंट ऑफिसर्स हॅरॅस्ड’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय असून या वेळी वाय. पी. सिंह यांच्यावरील ‘क्या यहीं सच है’ हा पुरस्कारविजेता लघुपट पाहण्याची संधी मिळणार आहे. यशदा येथील सभागृह येथे शनिवारी (३० जुलै) सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात मुंबई पोलीस दलातून निवृत्त झालेले वरिष्ठ निरीक्षक सुहास गोखले यांच्या ‘कैदी नंबर सी-१४८६१’ या आत्मचरित्राचे प्रकाशन होणार आहे. या वेळी सिंह यांच्या पत्नी आभा सिंह उपस्थित राहणार आहेत.
गीतरामायण
भारत विकास परिषदेतर्फे यंदाच्या श्रावण महिन्याची सुरुवात गीतरामायणाच्या सप्ताहाने होणार आहे. गीतरामायणाच्या हीरकमहोत्सवाचे औचित्य साधून संपूर्ण गीतरामायण ऐकण्याची संधी रसिकांना बुधवारपासून (३ ऑगस्ट) लाभणार आहे. मित्रमंडळ सभागृह येथे ११ ऑगस्टपर्यंत (६ आणि ९ ऑगस्ट वगळता) दररोज आठ गीते दत्ता चितळे, प्रार्थना साठे, तुषार रिठे, राधिका इंगळहळ्ळीकर हे कलाकार सादर करणार आहेत. मित्रमंडळ हौसिंग सोसायटीच्या सहकार्याने हा कार्यक्रम होत आहे.