उत्तराखंडमध्ये ढगफुटीनंतर ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीत अनेक दुर्गम-डोंगराळ भागात मदतीसाठी जवानांच्या जोडीला आता पुण्यातील गिर्यारोहक धावले आहेत. ‘गिरिप्रेमी’ संस्थेचे उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली दहा गिर्यारोहक आणि दोन डॉक्टरांचे पथक आज उत्तराखंडमध्ये दाखल झाले आहे.
उत्तराखंडमध्ये या नैसर्गिक आपत्तीमुळे शेकडो लोक मृत्युमुखी पडले असून, हजारो नागरिक-भाविक अद्याप अडकलेले आहेत. या सर्व आपद्ग्रस्तांच्या सुटकेसाठी लष्कराचे जवान कार्यरत आहेत. पण हा सर्व भाग अतिउंचीवरील आणि डोंगराळ असल्याने शोध आणि मदतकार्यात अनेक अडथळे येत आहेत. या कामात मदतीसाठी म्हणून पुण्यातील ‘गिरिप्रेमी’ आणि ‘स्वरूपसेवा’ संस्थेचे दहा गिर्यारोहक आणि दोन डॉक्टरांचे पथक आज उत्तराखंडमध्ये दाखल झाले आहे. उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली या पथकात आशिष माने, आनंद माळी, भूषण हर्षे, गणेश मोरे, टेकराज अधिकारी, कृष्णा ढोकळे (सर्व एव्हरेस्टवीर), अभिजित देशमुख, अतुल मुरमुरे, कौस्तुभ ठकार हे गिर्यारोहक आणि डॉ. प्रियादर्श तुरे, डॉ अनिकेत कांबळे हे दोन डॉक्टर असे बाराजण सहभागी झाले आहेत.
हे सर्व गिर्यारोहक उत्तराखंडमध्ये पिठोरगड जिल्हय़ातील असकोट, मोरी आणि धरसुला भागात मदतकार्य करणार आहेत. या भागात अद्याप पुरेशी मदत पोहोचलेली नाही. तसेच अतिउंचीवरील डोंगराळ भागामुळे इथे अनेक ठिकाणी गिर्यारोहण तंत्राची मदत उपयोगी पडणार असल्याचे झिरपे यांनी सांगितले. उत्तराखंडमधील या आपत्तीत अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे रस्ते वाहून गेले आहेत. अनेक अडथळे तयार झाले आहेत. या साऱ्यांवर मात करण्यासाठी गिर्यारोहणाच्या साधनांचा उपयोग करत अडकलेल्यांचा बचाव करावा लागणार असल्याचेही झिरपे यांनी सांगितले.
दरम्यान, या आपत्तीत मदतीची गरज लक्षात घेता, या पथकातील सर्वजण त्यांच्या व्यवसाय-नोक ऱ्यांमधून वेळ काढत, स्व:खर्चाने या भागात पोहोचले आहेत. त्यांनी बरोबर आवश्यक ती गिर्यारोहण साधने तसेच खाद्यपदार्थ आणि औषधेही नेली आहेत. तरीही त्यांना अद्याप आर्थिक आणि वस्तुरूपी मदतीची गरज आहे. ही मदत घेऊन आणखी एक पथक लवकरच रवाना होणार आहे. तरी यासाठी इच्छुकांनी निरंजन पळसुले (९८५०५१४३८०) किंवा अविनाश कांदेकर (९८८१२३४५०२) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
उत्तराखंडमधील मदतीसाठी धावले ‘एव्हरेस्टवीर’
उत्तराखंडमध्ये ढगफुटीनंतर ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीत अनेक दुर्गम-डोंगराळ भागात मदतीसाठी जवानांच्या जोडीला आता पुण्यातील गिर्यारोहक धावले आहेत.
First published on: 28-06-2013 at 02:50 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Everest veer at uttarakhand for help