पुणे : नव्या वर्षात नोकरदारांना सुट्यांची मेजवानी मिळणार आहे. प्रत्येक महिन्यात किमान एक सार्वजनिक सुटी येत असून रविवारला जोडून सोमवारीही सार्वजनिक सुट्या येत आहेत. त्यामुळे नव्या वर्षात कुटुंबाला अधिक वेळ देता येऊ शकणार असल्याचे दिसून येत आहे.

गणित अभ्यासक दीनानाथ गोरे यांनी ही माहिती दिली. नवे वर्ष सुरू होताच दिनदर्शिकेवरील लाल तारखा पाहून त्यानुसार कौटुंबिक सुट्या आणि कामाचे वेळापत्रक करण्यात येते. कौटुंबिक सुट्यांबरोबरच मोठे प्रवास, एक दिवसाच्या सहलींचे नियोजन, तयारी करण्यात येते. २०१७ प्रमाणे २०२३मध्येही काही सार्वजनिक सुट्या रविवारला जोडून येत आहेत. त्यात १ मे महाराष्ट्र दिन, २ ऑक्टोबरला महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंती, २७ नोव्हेंबरला गुरुनानक जयंती आणि २५ डिसेंबरचा नाताळ या सुट्यांचा समावेश आहे. त्याशिवाय मार्च-एप्रिलमध्ये रविवारसह एकूण सोळा दिवस सुट्या मिळणार आहेत. त्यात ७ मार्चला धुलिवंदन, २२ मार्चला गुढीपाडवा, ३० मार्चला रामनवमी, ४ एप्रिलला महावीर जयंती, ७ एप्रिलला गुड फ्रायडे, १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि २२ एप्रिलला रमजान ईदच्या सार्वजनिक सुटीचा समावेश आहे.

यंदा १८ जुलै ते १६ ऑगस्ट असा श्रावण ‘अधिक मास’ आहे. स्वातंत्र्य दिनाच्या १५ ऑगस्टच्या सुटीला जोडून बुधवारी १६ ऑगस्टला पारसी नववर्ष दिनाची सुटी मिळणार आहे. गणेश चतुर्थी १९ सप्टेंबरला मंगळवारी येत असल्याने अंगारक योग जुळून आला आहे. त्यामुळे गणेश भक्त आणि गणेश मंडळे गणरायाचे अधिक भक्तिभावाने स्वागत करतील. २५ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील सामने रंगणार आहेत. त्यामुळे क्रिकेट रसिकांना सामन्यांचा आस्वाद घेता येईल. त्याशिवाय ३० एप्रिलच्या रविवारनंतर १ मेची महाराष्ट्र दिनाची सार्वजनिक सुटी सोमवारी जोडून येत असल्याने बहुतांश शाळांचे निकाल शनिवारी २९ एप्रिलला जाहीर होतील, असे गोरे यांनी सांगितले.

काही सार्वजनिक सुट्या रविवारी…

छत्रपती शिवाजी महाराज जयंती, लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी रविवारी येत आहे. त्यामुळे या सार्वजनिक सुट्या रविवारच्या साप्ताहिक सुटीत जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच १४ नोव्हेंबरला बालदिनीच (पं. जवाहरलाल नेहरू जयंती) दिवाळी पाडव्याचीही सुटी आहे.

२०३४ मध्ये २०२३ ची पुनरावृत्ती

दर काही वर्षांनी दिनदर्शिकेची पुनरावृत्ती होते. त्यानुसार २०३४ मध्ये २०२३ च्या दिनदर्शिकेची (तारीख-वार समान) पुनरावृत्ती होणार असल्याची माहिती दीनानाथ गोरे यांनी दिली.

Story img Loader