पुणे : देशभरात रेल्वे गाड्यांमध्ये दर दोन दिवसांनी सरासरी एका महिलेची प्रसूती होत आहे. मागील आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये रेल्वे गाड्यांमध्ये १५८ प्रसूती झाल्या असून, यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला कर्मचाऱ्यांनी मदत केली आहे. याचवेळी रेल्वेच्या आवारात झालेल्या प्रसूतींची संख्या २२० आहे.
रेल्वेने मागील वर्षभरात रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) केलेल्या कामगिरीचा अहवाल जाहीर केला आहे. रेल्वे, रेल्वेच्या मालमत्ता आणि प्रवाशांचे संरक्षण करण्याची प्रमुख जबाबदारी आरपीएफवर आहे. विशेषत: महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेवर रेल्वेकडून लक्ष दिले जात आहे. यासाठी ८६४ रेल्वे स्थानके आणि रेल्वेच्या ६ हजार ६४६ डब्यांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. रेल्वेने प्रवास करणाऱ्या गर्भवतींची संख्याही जास्त आहे. रेल्वे गाड्यांमध्ये त्यांची प्रसूती होण्याच्या १५८ घटना मागील वर्षी घडल्या. याचबरोबर रेल्वे स्थानकांसह आवारामध्ये २०० जणींची प्रसूती झाली. यासाठी आरपीएफच्या महिला कर्मचाऱ्यांनी मदत केली.
हेही वाचा – एनएमएमएस शिष्यवृत्तीची निवड यादी जाहीर
आरपीएफने मागील वर्षी ८७३ पुरुष आणि ५४३ महिला प्रवाशांचा जीव वाचवला आहे. फलाट, लोहमार्ग आणि गाड्यांमध्ये आरपीएफने प्रवाशांना हे जीवदान दिले आहे. प्रवाशांच्या विसरलेल्या तब्बल ५० कोटी रुपयांच्या वस्तू आरपीएफने जमा केल्या. त्या नंतर खातरजमा करून प्रवाशांना परत करण्यात आल्या. तिकिटांचा काळा बाजार करणाऱ्या ४ हजार २८० जणांना मागील वर्षी अटक करण्यात आली.
वर्षभरात ८१ कोटींचे अमली पदार्थ जप्त
अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात आरपीएफने मोहीम उघडली आहे. रेल्वे सुरक्षा दलाने साहाय्यक फौजदार आणि त्यावरील अधिकाऱ्यांना अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत अमली पदार्थ तपासणी, जप्त करणे आणि तस्करांना अटक करण्याचे अधिकार दिले आहेत. रेल्वेतून मागील वर्षभरात १ हजार २२ जणांना अटक करून त्यांच्याकडून ८१ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याचबरोबर वन्यप्राणी आणि प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या ६८ जणांना अटक करण्यात आली आहे.