पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उपनेत्या आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यात येणार्या चार ही लोकसभा मतदार संघातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सारसबागेसमोरील शिवसेना भवन येथे पार पडली.
यावेळी मार्गदर्शन करतेवेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, केंद्र आणि राज्य सरकार मार्फत सर्व सामान्य नागरिकांच्या दृष्टीने घेण्यात आलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवा. याकरिता सर्वांनी सोशल मीडियावर ट्विटर, इंस्टा यांसारख्या समाजमाध्यमाचा प्रभावीपणे वापर करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर येत्या काळात लवकरच महायुतीच्या सर्व महिलांचा मेळावा आयोजित करण्यात येणार असून कोणीही नाराज न होता महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करायचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी एकजुटीने सर्व महायुतींच्या उमदेवाराचा प्रचार करायचा असल्याच त्यांनी यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना सांगितले.
आणखी वाचा-पिंपरी : अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे २४ ठिकाणी झाडपडीच्या घटना
शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी सारसबाग समोरील महालक्ष्मी देवीचे घेतले दर्शन
पुणे शहरातील सारसबागे समोरील महालक्ष्मी देवीचे नीलम गोऱ्हे यांनी दर्शन घेतले आणि पूजा देखील केली.आगामी निवडणुकीत महायुतीला यश मिळू दे, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुतीचे सरकार येऊ दे,असे साकडे नीलम गोऱ्हे यांनी देवीला घातले.तसेच राज्यातील शेतकरी,नागरिक यांना शक्ती, उत्तम आरोग्य, सौख्य आणि यश मिळू दे,अशी प्रार्थना देवी चरणी देखील नीलम गोऱ्हे यांनी केली.