पुणे : भोर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे हे भाजपच्या वाटेवर असून, त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सभासदत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भोरमध्ये आज, रविवारी (२० एप्रिल) बैठक आयोजित करण्यात आली असून, त्यामध्ये थोपटे भूमिका स्पष्ट करणार आहेत. थोपटे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांंची नुकतीच भेट घेतली. त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. थोपटे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे ई-मेलद्वारे राजीनामा पाठवला असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. थोपटे यांंच्या राजीनाम्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसला धक्का बसला आहे.

थोपटे यांनी रविवारी अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या फार्मसी हॉल येथे मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यासाठी भोर तालुक्यातील काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस कमिटी, सर्व सेलचे अध्यक्ष, तसेच पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक, भोर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि गावोगावचे सरपंच यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीत थोपटे हे भूमिका जाहीर करणार आहेत.

थोपटे कुटुंब हे काँग्रेसचे जुने घराणे आहे. संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे हे भोर विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले. अनंतराव थोपटे यांनी काँग्रेसच्या काळात १४ वर्षे राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून कार्यभार पाहिला आहे. अनंतराव थोपटे यांंच्यानंतर संग्राम थोपटे हे सलग तीन वेळा निवडून आले. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. महाविकास आघाडीचे सरकार असताना नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यावर रिक्त झालेल्या विभानसभा अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, त्यांना या पदापासून डावलण्यात आले. तेव्हापासून ते नाराज होते.

भाजपमध्ये जाण्यामागील कारण

संग्राम थोपटे यांनी लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांचे काम केले होते. त्यामुळे भोरमध्ये त्यांना मताधिक्य मिळाले. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांंची महायुतीकडून कोंडी करण्यात आली. भोरमधून त्यांंना पराभव पत्करावा लागला. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शंकर मांडेकर निवडून आले. थोपटे यांंचा राजगड सहकारी कारखाना हा आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. कारखाना वाचविण्यासाठी त्यांंनी भाजपशी जवळीक साधल्याची चर्चा आहे.

‘आत्मघातकी निर्णय घेऊ नये’

माजी आमदार संग्राम थोपटे यांंच्याशी संपर्क साधला आहे. त्यांनी आत्मघातकी निर्णय घेऊ नये. त्यांनी काँग्रेस पक्षात राहण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत,’ असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.