पिंपरी- चिंचवडमध्ये राहणाऱ्या तरुणीचे अश्लील फोटो लोकॅन्टो, इन्स्टाग्राम अशा साईट्सवर व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणी पूर्वी ज्या तरुणासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती, त्यानेच हे कृत्य केले असून टी. अश्विन असे या संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी चिखली पोलीस अधिक तपास करत आहेत.
सध्या पिंपरी- चिंचवडमध्ये राहणारी तरुणी पूर्वी चेन्नईतील रुग्णालयात कामाला होती. रुग्णालयात तिची अश्विनशी ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमसंबंधांमध्ये झाले. काही दिवसांनी दोघेही लिव्ह इन रिलेशन मध्ये राहू लागले. मात्र, यानंतर अश्विनने तरुणीला त्रास द्यायला सुरुवात केली. तो पीडित तरुणीचे अश्लील फोटो काढायचा. त्याने पीडित तरुणीचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ देखील काढला होता.
काही दिवसांपूर्वी तरुणी चेन्नईतून पिंपरी- चिंचवडला आली. तिला मोबाइलवर अज्ञात व्यक्तीचा फोन आला आणि त्याने अश्लील गप्पा मारायला सुरुवात केली. पीडितेने त्या पुरुषाला नंबर कुठून मिळाला याची विचारणा केली असता त्याने इंटरनेटवरुन नंबर मिळवल्याचे सांगितले. लोकॅन्टो, इन्स्टाग्राम, एक्स हॅमस्टर अशा विविध साइटवर पीडित तरुणीचे अश्लील छायाचित्र पोस्ट केले होते. त्या छायाचित्राखाली तरुणीचा मोबाईल क्रमांकही टाकला होता. हा प्रकार लक्षात येताच तिने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. तरुणीने या प्रकरणामागे टी. अश्विनचा हात असल्याचा आरोप केला असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.