पुणे : ‘निवडणूक आयोगाला स्वायत्तता आहे, मुक्त वातावरणात पारदर्शकपणे निवडणुका घेतल्या आहेत, असा आयोग आणि सरकारकडून निर्वाळा दिला जात असला, तरी जनतेच्या मनात मतदान यंत्रांबाबत शंका आहे. मग, सर्व मतदान यंत्रे आणि व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांच्या मोजणीला किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील इलेक्ट्रॉनिक तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याला सरकार का घाबरते,’ असा प्रश्न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी उपस्थित केला. ‘सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ठरावीक मतदान यंत्रांतील मतचिठ्ठ्यांची तपासणी झाली, तरी त्यातून काही निष्पन्न होणार नाही. कारण, ठरावीक मतदान यंत्रांमधील विदा (डेटा) नष्ट केला जाऊ शकतो,’ असेही ते म्हणाले.

हेही वाचा >>> वनराज आंदेकर खून प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ, गुन्हे शाखेकडून न्यायालायत अर्ज

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनानंतर चव्हाण यांनी आढाव यांची, त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, ‘कोणत्याही निवडणुकीत जनतेचा विश्वास असणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, मतदान यंत्राबाबत जनतेचा विश्वास राहिलेला नाही. पुन्हा मतपत्रिकेवर (बॅलेट पेपर) निवडणुकांकडे जाण्याची मानसिकता निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महाविकास आघाडीला ६५ टक्के मतदान केले. ४३ पैकी ३१ जागा (दोन तृतीयांश) देऊन केंद्रातील भाजप सरकारबद्दल तीव्र नाराजी दाखवून दिली. मात्र, पुढील चार महिन्यांच्या कालावधीत अचानक मतदारांच्या मनात एवढा बदल होऊन भाजप महायुती सरकारबद्दल इतका विश्वास संपादन करणे, अशक्य आणि अविश्वसनीय आहे. पक्ष फोडाफोडी, पेट्या घेऊन आमदार पळवापळवी आणि केंद्राकडून स्वायत्त यंत्रणांचा वापर करून विरोधकांना नामोहरम करण्यासाठी केलेले प्रयत्न याबाबत प्रचंड चीड असताना अचानक असा कोणता बदल झाला?’

हेही वाचा >>> राज्य सरकारच्या जंतनाशक मोहिमेतून पुण्याला वगळलं! नेमकं काय घडलं…

‘निवडणूक आयोग ही घटनात्मक स्वायत्त संस्था असताना राज्यातील निवडणुकीत आयोग अत्यंत संथपणे काम करत होता. आत्तापर्यंत एकदाही विरोधी पक्षांना मतदान यंत्र तपासणीसाठी दिलेले नाही. केवळ मतदान यंत्र तपासणीसाठी देऊन उपयोग नाही. मतदान यंत्रासोबत त्यातील संगणकीय ‘चिप’ आणि त्यामध्ये तयार केलेला ‘सोर्स कोड’ आणि इलेक्ट्राॅनिक सर्किट तपासण्यासाठी द्यावे,’ अशी मागणी चव्हाण यांनी केली.

 ‘भारतातील लोकशाहीबद्दल जगात कुतूहल’ ‘जगाच्या पाठीवरील सर्वांत मोठी लोकशाही असलेला देश म्हणून भारताची ओळख आहे. त्यामुळे भारताबाबत बाहेरच्या देशांतही कुतूहल आहे. त्यामुळे या देशातील निवडणुका पारदर्शक होतात, हे दाखविण्यासाठी आयोगाने मतदान यंत्राबाबत उपस्थित केलेले प्रश्न दूर करावेत. त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील इलेक्ट्राॅनिक तज्ज्ञांची समिती स्थापन करून मतदान यंत्र निर्दोष आहे, हे सिद्ध करावे,’ अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.