महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील फायर ब्रँड नेते वसंत मोरे यांनी काल पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. “मी लोकसभेसाठी इच्छूक होतो. हे मी दोन वर्षांपासून वारंवार सांगत आलो आहे. मी जर इच्छूक होतो तर पुण्यातील पक्ष संघटनेने राज ठाकरेंकडे नकारात्मक अहवाल का पाठवला?” असा सवाल वसंत मोरे यांनी आज पत्रकार परिषदेतून उपस्थित केला. “मी कोणत्याही पक्षाच्या ऑफरसाठी मनसेचा राजीनामा दिलेला नाही. मनसेमध्ये वातावरण चांगलं नसतानाही मी त्या पक्षात होतो. त्यामुळे इतर पक्षांकडून ऑफर आली म्हणून मी बाहेर पडणारा कार्यकर्ता नाही. मी सामान्य पुणेकरांसाठी लोकसभा निवडणूक लढविणार आहे”, असेही मोरे यांनी जाहीर केले.
पुण्याच्या संघटनेकडून असा काही अहवाल दिला नसल्याचे समोर आले आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर वसंत मोरे म्हणाले की, तुम्ही शाखाध्याक्षांना विचारा ज्या दिवशी राज साहेब पुण्यातून रागावून गेले, त्याच्या आदल्या दिवशी पुणे शहरात काय झालं होतं? पुण्यातील विधानसभेच्या शाखाध्यक्षांना सांगितलं गेलं होतं की, राज ठाकरेंनी लोकसभेबाबत विचारणा केली तर आपल्यासाठी जेमतेम वातावरण आहे, असे सांगा. पुण्यात लोकसभा लढविण्यासाठी आपल्याबाजूने पोषक वातावरण नाही, असे शाखाध्यक्षांना कुणी सांगितले? असा प्रश्न वसंत मोरे यांनी उपस्थित केला आहे.
“राजीनाम्यानंतर राज साहेबांचा फोन आला, मी म्हणालो…”, वसंत मोरे स्पष्ट बोलले…
“माझ्या पदाधिकाऱ्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली म्हणून त्यांना धमकावलं जात आहे. रात्री दोन-तीन वाजता त्यांना फोन लावून धमकावलं जात आहे. आणखी किती पक्ष संपविणार? असा सवाल वसंत मोरे यांनी उपस्थित केला. मला त्या पदाधिकाऱ्यांची नावं उघड करायची नाहीत, पुण्यातील कार्यकर्त्यांना त्यांची नावं माहीत आहेत”, असाही आरोप त्यांनी केला.
अजित पवार गटात मोरेंचं स्वागत – रुपाली ठोंबरे
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटीलदेखील उपस्थित होत्या. तुम्ही वसंत मोरेंसाठी काही प्रस्ताव आणला आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर त्या म्हणाल्या, माझी ऑफर मी कालच त्यांना दिली आहे. अजित पवार आणि मोरे यांचा थेट संपर्क आहे. त्यामुळे ते दोघं यावर निर्णय घेतील.