पुणे : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोमवारी मांजरी येथील संस्थेत करण्यात आले.ममता बाल सदन, सन्मती बाल निकेतन संस्था, मनःशांती छात्रालय आणि वनवासी गोपालकृष्ण बहुउद्देशीय मंडळ यांच्या वतीने सिंधुताईंची जयंती आणि बालदिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
‘कोणताही अनाथ मुलगा किंवा मुलगी उपेक्षित, वंचित राहू नये यासाठी ईश्वराने सिंधुताईंना देवदूत म्हणून या पृथ्वीवर पाठविले. त्यांच्या हातून ईश्वरीय कार्य घडले. माया, करुणा, ममता याचे जिवंत उदाहरण सिंधुताई होत्या. रस्त्यावर कोमेजलेल्या फुलांना उचलून त्यांनी झाड बनून मायेची सावली दिली.
संगोपन आणि पालनपोषण करून त्यांनी कोमेजलेल्या फुलांना जीवनदान देऊन उमललेल्या फुलांसारखे घडविले ही खूप मोठी गोष्ट आहे, अशा भावना माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी या वेळी व्यक्त केल्या. उपस्थित बाल-गोपाळांशी त्यांनी दिलखुलास संवाद साधला. ममता सिंधुताई सपकाळ, ममता बाल सदनचे अध्यक्ष दीपक गायकवाड, मनःशांती छात्रालयचे अध्यक्ष विनय नितवने या वेळी उपस्थित होते. सिंधुताईंना मिळालेल्या भेट वस्तू आणि त्यांच्या दुर्मीळ छायाचित्र संग्रह असलेल्या नवीन संग्रहालयाचे या वेळी उद्घाटन करण्यात आले.