सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परीक्षा विभागाबाबत तक्रारी येतात म्हणून कारभारी बदलले, परीक्षा विभागासाठी अर्थ संकल्पात भरभक्कम आर्थिक तरतूद केली, परीक्षेच्या कामात काहीही अडचणी येणार नाहीत अशी ग्वाही दिली.. मात्र, अद्यापही परीक्षा विभागातील गोंधळ कायम आहेत. प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी वेळेवर पासवर्ड्स मिळत नसल्यामुळे ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा परीक्षा सुरू होणे, विद्यार्थ्यांना वारंवार खेटे घालूनही उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती वेळेवर न मिळणे.. या परीक्षा विभागाच्या सगळ्या परंपरा सुरूच आहेत.
विद्यापीठाच्या कला, शास्त्र आणि वाणिज्य शाखेच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. गेल्या दोन वर्षांपासून विद्यापीठाच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका ऑनलाइन पाठवण्यात येतात. प्रत्येक महाविद्यालयाला प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी विद्यापीठाकडून पासवर्ड दिला जातो. महाविद्यालयाने पासवर्ड वापरून प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून त्यानंतर त्या छापून वर्गामध्ये वाटणे अपेक्षित असते. मात्र, विद्यापीठाकडून वेळेवर पासवर्ड्स येत नसल्यामुळे प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्यास उशीर होत आहे. प्रथम वर्ष विज्ञान शाखेच्या संगणक शास्त्र विषयाची परीक्षा अनेक महाविद्यालयांमध्ये मंगळवारी अर्धा ते पाऊणतास उशिरा सुरू झाली. दुपारी ३ वाजता परीक्षा सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, महाविद्यालयांना प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठाची पासवर्ड परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे मिळाला. आठ पानांची प्रश्नपत्रिका डाऊनलोड करणे, त्याच्या छायाप्रती काढणे आणि वर्गातील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार त्याचे गठ्ठे करून ते वाटण्यासाठी देणे, या प्रक्रियेत महाविद्यालयांचा अर्धा तास गेला. दुसऱ्या दिवशीही याच प्रसंगाची पुनरावृत्ती झाली बुधवारी विज्ञान शाखेची द्वितीय वर्षांची गणिताची परीक्षा होती. त्या वेळीही पासवर्ड उशिरा आल्यामुळे परीक्षा सुरू होण्यासाठी उशीर झाला.
परीक्षा विभागाच्या या ‘तत्पर’ कारभारामुळे महाविद्यालयांचे प्राचार्य हतबल झाले आहेत. काही वेळा परीक्षा सुरू करण्याची वेळ उलटून गेल्यानंतर विद्यापीठाकडून पासवर्ड्स येतात, असे एका प्राचार्यानी सांगितले. ‘पासवर्ड उशिरा येणे हे नेहमीचेचे झाले आहे. पासवर्ड आल्यानंतर पुढील प्रक्रियेला महाविद्यालयाला काही वेळ लागतो. मात्र ही बाब लक्षात घेतली जात नाही. महाविद्यालयांवर कारवाई करण्यासाठी मात्र परीक्षा विभाग कायमच उत्सुक असलेला दिसून येतो. परीक्षा उशिरा सुरू झाल्यानंतर केंद्रावर काही गैरप्रकार घडू नये, विद्यार्थ्यांना चांगल्या वातावरणात परीक्षा देता यावी, याची टांगती तलवार प्राचार्याच्या डोक्यावर असते,’ अशी तक्रार एका प्राचार्यानी केली आहे.
विद्यार्थीही निराश
विद्यार्थीही निराशाच आहेत. विद्यापीठाने गेल्यावर्षी बदललेल्या नियमानुसार पुनर्मूल्यांकनाचा अर्ज करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, अर्ज करून महिना झाला, तरीही विद्यापीठाकडून उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मिळालेल्या नाहीत, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. या वर्षी छायाप्रती काढण्याचे कंत्राट बाहेरील संस्थेला देण्यात आले आहे, त्यांच्याकडून काम होत नसल्याचे उत्तर परीक्षा विभागाकडून विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. मात्र, पुढील परीक्षा तोंडावर आल्या तरी आधीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मिळाल्या नसल्यामुळे विद्यार्थी अडचणीत आले आहेत.
याबाबत विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा