पुणे विद्यापीठाच्या परीक्षांचे अर्ज आता मोबाईलवरही भरता येणार आहेत. परीक्षा विभागाने आता स्वतंत्र संकेतस्थळही तयार केले आहे, अशी माहिती पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी परीक्षा नियंत्रक संपदा जोशी उपस्थित होत्या. आतापर्यंत परीक्षा विभागाची कामे महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळाच्या लिंकवरून होत होती. मात्र, आता परीक्षा विभागाने स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. याच संकेतस्थळावर आता परीक्षांचे निकाल, अर्ज, अधिकार मंडळांचे निर्णय याची माहिती मिळणार आहे. मोबाईलच्या माध्यमातून अर्ज भरण्याची प्रणालीही विद्यापीठाने विकसित केली असून येत्या ऑक्टोबरच्या परीक्षांसाठी ही प्रणाली वापरता येऊ शकते, असे डॉ. गाडे यांनी सांगितले.
वाङ्मय चौर्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना पकडण्यासाठी विद्यापीठाने सुरू केलेल्या प्रणालीच्या माध्यमातून तीन प्राध्यापकांचे वाङ्मय चौर्य उघडकीस आले आहे. जुन्या प्रबंधाची नक्कल करून पीएचडीचा प्रबंध सादर करताना प्राध्यापक पकडले गेले आहेत. या प्रकरणी प्राध्यापकांवर कारवाई सुरू असून त्यांची वेतनवाढ रोखली जाईल किंवा वेळप्रसंगी नोकरीही घालवण्याची वेळ या प्राध्यापकांवर येईल, असे डॉ. गाडे यांनी सांगितले.
पालिकेच्या ग्रंथालयाच्या प्रस्तावावर व्यवस्थापन परिषदेत निर्णय
सुसज्ज ग्रंथालय उभे करण्यासाठी पुणे विद्यापीठात जागा मिळावी असा प्रस्ताव पुणे महानगरपालिकेने विद्यापीठाला दिला होता. या प्रस्तावावर आणि सायन्स पार्क उभे करण्याच्या विद्यापीठाच्या योजनेवर येत्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे डॉ. गाडे यांनी सांगितले. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक ५ मार्चला होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा