सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परीक्षा विभाग आता पूर्णपणे सुधारला आहे.. फक्त इतकेच, की वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी महाविद्यालयांना एकच पासवर्ड मिळतो, पुन्हा दुसरा पासवर्ड पाठवला जातो काय आणि दुसरा पासवर्ड नेमका पाठवला तरी कुणी? याचे कोडे महाविद्यालयांना सतावते काय.. परीक्षेत अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी येतात, काही वेळा पासवर्ड उशिरा मिळतात.. असे परीक्षा विभागाचे कामकाज आता एकदम ‘सुरळीत’ सुरू आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सध्या सत्र परीक्षा सुरू आहेत. विद्यापीठाकडून महाविद्यालयांना ऑनलाइन प्रश्नपत्रिका पाठवण्याची प्रणाली गेल्या वर्षीपासून विद्यापीठाने कार्यरत केली आहे. सोमवारी बीबीए, बीसीए, बीबीएम, आयबी या वाणिज्य शाखेतील अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी सकाळी साधारण ९ वाजून ४० मिनिटांनी महाविद्यालयांना पासवर्डचे एसएमएस आले. सगळ्या अभ्यासक्रमांच्या सगळ्या विषयांसाठी एकच पासवर्ड असल्याचे बघून प्राचार्याचाही गोंधळ उडाला. त्यानंतर काही मिनिटांत प्राचार्याना दुसरा एसएमएस आला. त्यामध्ये पासवर्ड बदलण्यात आला होता. मात्र, या वेळीही सगळे अभ्यासक्रम, सगळ्या शाखा एकच पासवर्ड असेच समीकरण होते. मात्र, त्या वेळी परीक्षा सुरू व्हायला अगदीच कमी कालावधी राहिला होता. त्यामुळे अनेक महाविद्यालयांनी जुना पासवर्ड वापरून प्रश्नपत्रिकांच्या प्रिंटआउट्सही काढल्या होत्या. दुसरा पासवर्ड पाठवण्यात आला नसल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे. त्यामुळे तासाभरानंतर दुसरा एसएमएस आला कुठून असे नवेच कोडे आता प्राचार्याना सतावत आहे
महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रमाच्या परीक्षा नसतानाही त्यांना इतर शाखांचे पासवर्ड्स मिळाले होते. आपल्याकडे अभ्यासक्रमच नाही, तरीही त्या विषयांचे पासवर्ड्स मिळाल्यामुळे प्राचार्याकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. पासवर्ड्सच्या बाबतीतील निष्काळजीपणामुळे प्रश्नपत्रिका फुटण्याचाही धोका असल्याचे महाविद्यालयाच्या प्राचार्यानी सांगितले.
याबाबत विद्यापीठाचे प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी सांगितले, ‘‘पासवर्डबाबत महाविद्यालयांकडून तक्रार आली, तरच पासवर्ड बदलून पाठवण्यात येतात. सोमवारी अशाप्रकारे कोणतेही पासवर्ड्स बदलून देण्यात आलेले नाहीत. त्याचप्रमाणे महाविद्यालयांमध्ये ज्या विषयांच्या परीक्षा होत्या, त्याचेच पासवर्ड्स पाठवण्यात आले आहेत.’’
भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेत चूक?
वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षांच्या भौतिकशास्त्राची परीक्षा शनिवारी होती. मटेरिअल सायन्स या विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील पहिले काही प्रश्न हे अभ्यासक्रमाबाहेरचे असल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. मात्र, ‘विद्यापीठाकडे अधिकृतपणे अशी कोणतीही तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यास त्यासंबंधी तज्ज्ञांचे मत घेऊन निर्णय घेण्यात येईल,’ असे विद्यापीठाचे प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी सांगितले.
पासवर्डचा घोळ अन् अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न!
वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी महाविद्यालयांना एकच पासवर्ड मिळतो, पुन्हा दुसरा पासवर्ड पाठवला जातो काय आणि दुसरा पासवर्ड नेमका पाठवला तरी कुणी?
First published on: 11-11-2014 at 03:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exam pune university paper password