लालफितीच्या कारभारात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांचे वेळापत्रकाची ‘मागील पानावरून पुढे’ अशीच परिस्थिती या महिन्यातही दिसत आहे. परीक्षेची नियोजित तारीख उलटूनही परीक्षांचे मागणीपत्रकच अद्याप आयोगाला मिळालेले नाही. त्यातच विविध न्यायालयीन प्रकरणांत अनेक परीक्षांचे निकालही रखडल्यामुळे उमेदवारांचे नियोजनही कोलमडले आहे.
आयोगाकडून या वर्षीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक पाळले जात नाही, अशी तक्रार उमेदवारांकडून गेली अनेक वर्षे केली जात आहे. या वर्षीही वेळापत्रक जाहीर करूनही त्यानुसार अनेक परीक्षा झालेल्या नाहीत. नियोजित वेळापत्रकानुसार अनेक परीक्षांच्या तारखा उलटून गेल्या, तरीही अद्याप नियोजित परीक्षांपैकी निम्म्या परीक्षांसाठी शासनाकडून आयोगाला मागणीपत्रक मिळालेले नाही. त्यामुळे आयोगाच्या परीक्षा आणि परिणामी पुढील भरती रखडली आहे.
आयोगाकडून जाहीर करण्यात आलेले वेळापत्रक पाळले जात नसल्यामुळे आयोगाच्या कार्यपद्धतीबाबतही उमेदवारांना अविश्वास वाटू लागला. त्या पाश्र्वभूमीवर उमेदवारांचा विश्वास जपण्यासाठी परीक्षांच्या नियोजनाची सद्य:स्थिती आयोगाकडून जाहीर करण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र, गेले दोन महिने जाहीर केलेली परीक्षांची सद्य:स्थिती आणि वेळापत्रक हे ‘मागील पानावरून पुढे’ अशाच स्वरूपाचे आहे. गेल्या दोन महिन्यात एखादीच परीक्षा वेळापत्रकाप्रमाणे झाल्याचे दिसत आहे. २२ परीक्षांपैकी ९ परीक्षांसाठी अद्यापही शासनाकडून परिपूर्ण मागणीपत्रक आलेले नाही. यामध्ये पोलिस उपनिरीक्षक पदासाठीची परीक्षा, महाराष्ट्र राज्य वनसेवा परीक्षा, विक्रीकर निरीक्षक परीक्षा अशा अनेक महात्त्वाच्या पदांच्या परीक्षा आहेत. यातील काही परीक्षांची नियोजित तारीखही उलटून गेली आहे. विविध न्यायालयीन प्रकरणांत आणि आरक्षणाबाबत स्पष्टीकरण न आल्यामुळे आयोगाच्या काही परीक्षांचे निकालही रखडले आहेत. त्यामुळे परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे वेळापत्रकही कोलमडले आहे.
 कर सहायक परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कर सहायक गट ‘क’ परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. एकूण सातशे पदांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेतील ५८८ पदांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. न्यायालयीन निकाल प्रलंबित असल्यामुळे ११२ आरक्षित पदांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. या परीक्षेत नाशिक येथील रोहन कुवर हे राज्यात प्रथम आले आहेत, तर महिलांमध्ये मिरज येथील पूजा राजमाने प्रथम आल्या आहेत.

Story img Loader