लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) आज (८ जुलै) टंकलेखन कौशल्य चाचणी आयोजित करण्यात आली आहे. मुंबईमध्ये ही परीक्षा होत आहे. मात्र मुंबईत होत असलेल्या अतिवृष्टीचा फटका या परीक्षेला बसला आहे. त्यामुळे एमपीएससीने तातडीने उपाययोजना केली आहे.
कौशल्य टंकलेखन परीक्षेसाठी राज्यभरातून उमेदवार मुंबईत दाखल झालो आहेत. एकूण चार सत्रांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र मुंबईत अतिवृष्टी सुरू असल्याने या परीक्षेचे नियोजन बाधित झाले आहे. त्यामुळे या परीक्षेबाबत आयोगाने तातडीने उपाययोजना केल्या आहेत. या संदर्भात एमपीएससीने एक्स या समाजमाध्यमातील अधिकृत खात्याद्वारे माहिती दिली.
आणखी वाचा-पिंपरी : सीआयडीतील पोलीस अंमलदाराचा पिंपळे सौदागर येथे अपघाती मृत्यू… झाले काय?
मुंबईमध्ये अतिवृष्टीमुळे रेल्वे सेवा व इतर वाहतूक सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाल्याने दिनांक ८ जुलै २०२३ रोजी आयोगामार्फत आयोजित चारही सत्रांची टंकलेखन कौशल्य चाचणी ही नियोजित वेळेपेक्षा ४५ मिनिटे उशिराने सुरू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. तसेच उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्याची अंतिम वेळ प्रत्येक सत्राकरिता ४५ मिनिटांनी वाढवण्यात येत आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, अशी माहिती एमपीएससीने स्पष्ट केले.
काही दिवसांपूर्वी याच परीक्षेबाबत गोंधळ उडाला होता. महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३, मधील लिपिक टंकलेखक व करसहायक या संवर्गाची ‘टंकलेखन कौशल्य चाचणी’ परीक्षेत पहिल्याच दिवशी तांत्रिक गोंधळ उडाल्याने १ ते ३ जुलैपर्यंतची परीक्षा रद्द करण्यात आली होती.