लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विभागातील ‘ब’ आणि ‘क’ गटातील १५ संवर्गातील रिक्त ३८७ जागांसाठी ऑनलाइन परीक्षा होणार आहे. २६, २७ आणि २८ मे २०२३ रोजी तीन सत्रांमध्ये परीक्षा होणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी दिली.
राज्य शासनाने महापालिकेच्या नोकर भरतीवरील निर्बंध उठविल्यानंतर प्रशासनाने भरतीची प्रक्रिया सुरु केली. ‘ब’ आणि ‘क’ गटातील ३८७ जागा सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी १३ ऑगस्ट २०२२ रोजी जाहिरात प्रसिद्ध करत ऑनलाइन अर्ज मागविले होते. प्राप्त झालेल्या एक लाख ३० हजार ४७० अर्जांपैकी छाननीत ८५ हजार ७७१ उमेदवारांचे अर्ज पात्र झाले. त्यामुळे ३८६ जागांसाठी ८५ हजार ७७१ परीक्षार्थी असणार आहेत.
आणखी वाचा- पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हमाल मापाडी मतदार संघातून संतोष नांगरे विजयी
जाहिरातीमध्ये प्रसिद्ध केलेल्या पदांचे आरक्षण हे विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेण्यात आले. त्यात काही पदांच्या रिक्त जागा आणि आरक्षणामध्ये बदल झालेला आहे. अंतिम आरक्षणाप्रमाणे १५ संवर्गातील ३८७ रिक्त जागांची ऑनलाइन परीक्षा मे महिन्यात होणार आहे. अंतिम झालेले आरक्षण, जाहिरातीमधील जागांसाठी विहित केलेला अभ्यासक्रम तसेच ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र याबाबतची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.