साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्यतृतीयेनिमित्त शनिवारी सोन्याच्या खरेदीसाठी पुण्या मुंबईसह राज्यभरात सराफी पेढय़ांमध्ये ग्राहकांची गर्दी होती. भाव चढे असूनही ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह होता.पुण्यात सोन्याचा भाव २२ कॅरेटसाठी प्रतितोळा ५६ हजार ३०० रुपये, तर २४ कॅरेटसाठी ६१ हजार २०० रुपये होता. मुंबईतील भाव २२ कॅरेटसाठी ५६ हजार ५०० रुपये होता. ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे (जीजेसी) अध्यक्ष सयाम मेहरा म्हणाले की, सोन्याच्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होती. सोन्याच्या भावात काही प्रमाणात घट झाल्याने ग्राहकांनी उत्साहाने सोनेखेरदी केले. ग्राहकांची पसंती प्रामुख्याने हलक्या वजनाच्या दागिन्यांना होती. ५ ते ३३ ग्रॅम वजनाचे दागिने आणि १ ते २ ग्रॅम वजनाची सोन्याची नाणी यांना जास्त मागणी होती. विशेष म्हणजे, हॉलमार्किंगमधील बदलानंतर ग्राहक नाण्यांपेक्षा दागिन्यांना प्राधान्य देत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१७ ते १८ टन सुवर्णखरेदी?

अक्षय्यतृतीयेला १७ ते १८ टन सोने खरेदी झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी अक्षय्यतृतीयेनंतर लगेचच विवाह मुहूर्त सुरू झाले होते. त्यामुळे अक्षय्यतृतीयेला विवाहाच्या दागिन्यांची मोठय़ा प्रमाणावर खरेदी झाली होती. यंदा विवाहाचे मुहूर्त जून-जुलैमध्ये सुरू होत असल्याने मे महिन्यात विवाहाच्या दागिन्यांची विक्री वाढण्याची शक्यता आहे.

अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त सप्ताह अखेरीस आल्याने सोन्याला चांगली मागणी होती. या शुभ मुहूर्तावर दागिने खरेदीला प्राधान्य दिले जाते. रविवारीही खरेदीचा उत्साह असेल. हिऱ्याचे दागिने, हलक्या वजनाच्या दागिन्यांना ग्राहकांनी पसंती दिली. यंदा दागिन्यांच्या विक्रीत १५ टक्के वाढ झाली. – सौरभ गाडगीळ, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएनजी ज्वेलर्स

सोन्याचे भाव चढे असूनही विक्रीत ५ ते १० टक्के वाढ झाली. लग्नसराईच्या खरेदीसाठीही अनेकांनी हा मुहूर्त साधला. सर्वच प्रकारचे दागिने, सोन्याच्या तारा, नाणी, बिस्किट आदींना मागणी होती. यावर्षी हिऱ्याच्या दागिन्यांना तरुणाईने विशेष पसंती दिली. – अमित मोडक, संचालक-सीईओ, पीएनजी सन्स