रेल्वेच्या पुणे विभागाच्या वतीने महिला दिन बुधवारी उत्साहात साजरा करण्यात आला. पुण्यासह कोल्हापूर, सातारा, चिंचवड, मिरज, लोणी स्थानके, पुणे डिझेल शेड, घोरपडी कोचिंग कॉम्प्लेक्ससह रेल्वेच्या इतर कार्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.पुणे विभागीय कार्यालयात अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेशकुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिला सेवा संघटनेच्या उपाध्यक्षा नीलम सिंह, कोषाध्यक्षा अनिता हिरवे, विभागीय मनुष्यबळ अधिकारी जितेंद्रप्रताप सिंह यांच्यासह इतर अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा >>>पुण्यात महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनी केला दारू अड्डा उद्धवस्त
पुणे विभागात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांबद्दल माहिती देणाऱ्या तपन या पुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. याचबरोबर अशा महिला कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला. महिलांसाठी चित्रकला, रांगोळी, निबंध, पाककला आदी स्पर्धाही घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नमाला प्रभुणे यांनी केले तर आभार हर्षदा जोशी यांनी मानले.