लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय या मार्गावर पुढील महिन्यात मेट्रोची सेवा सुरू होणार आहे. असे असले तरी खडकी आणि रेंजहिल्समधील नागरिकांना मात्र या सेवेचा फायदा होणार नाही. कारण या मार्गांवरील ही दोन्ही स्थानके मेट्रो सेवेतून सध्या वगळण्यात आली आहेत. संरक्षण मंत्रालयाने महामेट्रोकडे जमीन हस्तांतरित करण्यास उशीर केल्याने या स्थानकांना विलंब लागणार आहे.

फुगेवाडी ते जिल्हा न्यायाल हा मार्ग ८ किलोमीटरचा आहे. या मार्गावर फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, शिवाजीनगर आणि जिल्हा न्यायालय ही स्थानके आहेत. या मार्गावर खडकी आणि रेंज हिल्स ही स्थानकेही नियोजित आहेत. ही दोन्ही स्थानके संरक्षण विभागाच्या जागेवर आहेत. त्यांच्याकडून या प्रस्तावाला मान्यता मिळून जागा महामेट्रोकडे हस्तांतरित करण्यास विलंब झाला. यामुळे पहिल्या टप्प्यात ही दोन्ही स्थानके वगळण्याचा निर्णय मेट्रोने घेतला आहे. पुढील टप्प्यात या स्थानकांचा समावेश केला जाऊ शकतो, असे मेट्रोतील सूत्रांनी सांगितले.

आणखी वाचा- मेट्रोची पुण्यातून पिंपरीपर्यंत धाव!

खडकी आणि रेंजहिल्स या स्थानकांवर मेट्रो थांबणार नसल्याने या परिसरातील प्रवाशांची गैरसोय होणार आहे. त्यांना मेट्रोने प्रवास करायचा झाल्यास अलीकडील अथवा पुढील स्थानकावर उतरावे लागेल. यामुळे या भागातील नागरिकांना मेट्रोतून प्रवास करणे अडचणीचे ठरेल, अशी स्थानिक नागरिकांची भावना आहे.

मार्ग मोठा असूनही स्थानके कमी

नव्याने सुरू होणारा फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय हा मेट्रो मार्ग आठ किलोमीटरचा आहे. सुरुवातीचे आणि शेवटचे स्थानक सोडून मार्गावर केवळ तीन स्थानके आहेत. याचवेळी गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल हा मेट्रो मार्ग केवळ ५.१२ किलोमीटरचा आहे. या मार्गावर सुरुवातीचे आणि शेवटचे स्थानक सोडून सहा स्थानके आहेत. त्यामुळे फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय मार्ग मोठा असूनही स्थानकांची संख्या कमी असल्याचे चित्र आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Excludes khadki range hills metro stations pune print news stj 05 mrj
Show comments