पाकिस्तानचा अपवाद वगळता सर्व शेजारी राष्ट्रांशी भारताचे गेल्या दहा वर्षांत चांगले संबंध आहेत, असे मत पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी शनिवारी व्यक्त केले. भारतातून पाकिस्तानामध्ये वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी भारतातर्फे करण्यात येत असलेल्या प्रयत्नांबाबत पाकिस्तानने सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
सिंबायोसिस इन्स्टिटय़ूट ऑफ इंटरनॅशनल स्टडीजतर्फे सुरू करण्यात आलेल्या राम साठे अध्यासनाच्या उद्घाटनप्रसंगी ‘भारत आणि शेजारी राष्ट्रे’ या विषयावर शिवशंकर मेनन यांचे व्याख्यान झाले. सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, कुलगुरु डॉ. विद्या येरवडेकर, उपकुलगुरु डॉ. रजनी गुप्ते, माजी राजदूत प्रकाश शहा, ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर आणि अध्यासनाचे प्रा. सुधीर देवरे या प्रसंगी उपस्थित होते.
शिवशंकर मेनन म्हणाले, ‘‘पाकिस्तानशी चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत या उद्देशातून भारतातर्फे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सीमेपलीकडून होणारा दहशतवाद आणि २६-११ ची घटना हे त्यामध्ये अडथळे ठरत आहेत. भारताशी व्यापारी आणि आर्थिक संबंध वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे, अशी पाकिस्तानमधील नागरिकांची भावना आहे. भारताच्या प्रयत्नांना पाकिस्तानकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे प्रश्नांची उकल होणे अवघड झाले आहे. मात्र, भारतातून पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पाकिस्तानने सकारात्मक भूमिका घेतली आहे.’’
‘‘भारताचे नेपाळशी राजनैतिक संबंध चांगले आहेत. श्रीलंकेबरोबरचे राजकीय संबंध चांगले करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. श्रीलंकेमध्ये २७ वर्षांपासून सुरू असलेल्या अंतर्गत यादवीचा फटका या संबंधांमध्ये बसत आहे. झपाटय़ाने विकास करणारा चीन हा भारताचा सर्वात मोठा शेजारी देश आहे. एकीकडे स्पर्धा आणि दुसरीकडे काही प्रश्नांसंदर्भात सहकार्याची भूमिका अशा दोन पातळ्यांवर चीनबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी पावले उचलावी लागतील. सागरी सीमांच्या सुरक्षेसंदर्भात ठोस कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे,’’ असेही शिवशंकर मेनन यांनी सांगितले. वेगवेगळ्या शेजारी देशांतील गुंतागुंतीची राजकीय परिस्थिती आणि विविध प्रश्नांना हाताळत चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील रहावे लागेल. यामध्ये चित्र गुंतागुंतीचे असले तरी नकारात्मक अजिबात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाष्य करणे योग्य नाही
हैदराबाद येथील स्फोटाचा तपास सुरू झाला आहे. त्यामुळे याविषयी कोणतेही भाष्य करणे योग्य होणार नाही. त्याचप्रमाणे या स्फोटाविषयी काही निष्कर्षांप्रत येणे हे घाईचे होईल, अशा शब्दांत शिवशंकर मेनन यांनी भूमिका स्पष्ट करीत यासंदर्भात अधिक प्रश्न विचारू नयेत, असेही सांगितले. राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राच्या (नॅशनल काऊंटर टेररिझम सेंटर – एनसीटीसी) उभारणीसंदर्भात अजून हा प्रस्ताव चर्चेच्या पातळीवरच असल्याचे त्यांनी सांगितले.