लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. नव्या-जुन्यांना संधी देत लवकरच कार्यकारिणी जाहीर केली जाणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर शहराध्यक्ष इम्रान शेख सुरुवातीला अजित पवार यांच्या गटासोबत गेले होते. त्यानतंर ते पुन्हा शरद पवार यांच्या गटात दाखल झाले. शहरातील युवक हा विचारधारेशी बांधील असून, या बदललेल्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांच्या राजकीय व सामाजिक राजकीय चळवळीची गरज निर्माण झाली आहे.
आणखी वाचा-पिंपरी महापालिकेचे १७० कोटी ‘पाण्यात’!
राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारधारेनुसार काम करणाऱ्या या पदांवरील पदाधिकाऱ्यांना अधिवेशन संपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘राष्ट्रवादी युवक काँग्रेस’ची नवीन कार्यकारिणी स्थापन करून लवकरच नवीन जबाबदाऱ्या देण्यात येतील, असे शेख यांनी स्पष्ट केले.