पुणे शहरासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखडय़ाचा लाभ काही मोजक्या व्यावसायिकांना आणि हितसंबंधियांनाच होणार असून या आराखडय़ाचा लाभ ज्यांना होणार आहे, त्यांच्या सात/बारा उताऱ्यांचे प्रदर्शन पुणे बचाव कृती समितीतर्फे ७ व ८ ऑगस्ट रोजी भरवले जाणार आहे.
कृती समितीतर्फे नगरसेवक संजय बालगुडे यांनी सोमवारी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. आराखडय़ाचा लाभ काही मोजक्या व्यावसायिकांना होणार असून त्यांच्यासाठीच अनेक आरक्षणे उठवण्यात आली आहेत. आरक्षणे उठवण्याच्या या कृतीचा लाभ कोणाकोणाला होणार आहे ते आम्ही प्रदर्शनाच्या माध्यमातून पुणेकरांसमोर मांडणार आहोत. त्यासाठी आतापर्यंत दोनहजार सात/बाराचे उतारे जमा करण्यात आले आहेत. त्यातील ५० उतारे प्रत्यक्ष प्रदर्शनात मांडले जातील. तसेच अन्य सर्व उतारे प्रदर्शनाच्या ठिकाणी पाहण्यासाठी उपलब्ध असतील, असे बालगुडे यांनी सांगितले.
प्रदर्शनातील सात/बारा उतारे पाहिल्यानंतर आराखडय़ाचा लाभ नक्की कोणाला होणार आहे ते पुणेकरांना समजेल. म्हणून या प्रदर्शनाला ‘पोलखोल’ असे नाव देण्यात आले आहे, असेही ते म्हणाले. या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या हस्ते बुधवारी (७ ऑगस्ट) सकाळी साडेदहा वाजता केले जाणार असून प्रदर्शन बुधवार व गुरुवारी (७, ८ ऑगस्ट) सकाळी साडेदहा पासून दिवसभर खुले असेल.

Story img Loader