पुणे : कृती आधारित शिक्षणासाठीची खेळणी, गोष्टींची पुस्तके ते आभासी वास्तव अशा वैविध्यपूर्ण शिक्षण पूरक साधनांचा अनुभव विद्यार्थी आणि पालकांना घेता येत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुल येथे आयोजित शैक्षणिक साधनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राबाबतची माहिती या प्रदर्शनात मांडण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जी-२० परिषदेअंतर्गत शिक्षण कार्यगटाची बैठक पुण्यात होत आहे. या अनुषंगाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून कृती आधारित शिक्षण पद्धतीद्वारे मुलांना आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठीच्या शैक्षणिक साधनांचे, शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीसाठी उपक्रमांचा प्रदर्शात समावेश आहे. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, व्यवस्थापन समितीचे सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, संयोजन समितीचे समन्वयक राजेश पांडे आदी या वेळी उपस्थित होते.

प्रदर्शनात शंभरहून अधिक शिक्षणसंस्था आणि उत्पादकांची दालने आहेत. युनिसेफ, एनएसडीसी, एनसीईआरटी, नॅशनल बूक ट्रस्ट, भारतीय नॉलेज सिस्टिम्स्‌‍ डिव्हिजन, मायक्रोसॉफ्ट, गुगल, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, विविध राज्य सरकारांचे शैक्षणिक उपक्रम आदींचा त्यात समावेश आहे. आदर्श बालवाडी विविध भाषांतील पुस्तके, ४० विज्ञान प्रयोगांची माहिती देणारी सायकल, खेळ आणि अभ्यासाचे महत्त्व, कौशल्य अभ्यासक्रम, भारतीय पारंपारिक खेळ, पूर्व प्राथमिकसाठी डिजिटल अभ्यासक्रम, वाचन, गणन आणि लेखन कौशल्ये विकसित करण्यासाठीची खेळणी, प्रात्यक्षिके, कोडी, आभासी वास्तव असे वैविध्यपूर्ण साहित्य प्रदर्शनात मांडण्यात आले आहे. शिक्षण प्रक्रिया आनंददायी करणे, मुलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक विकासासाठी लेखन, वाचन आणि गणन या प्रक्रिया सोप्या पद्धतीने शिकणे, मुलांची बुद्धिमत्ता आणि कौशल्यात वृद्धी करणे, आकलन, निरीक्षण, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण, निर्णय प्रक्रिया या मूलभूत प्रक्रिया विकसित होण्यासाठी पूरक साधनांचा कसा वापर करता येऊ शकतो याची माहिती या प्रदर्शनातून विद्यार्थी, पालक, शिक्षकांना मिळत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळांतील विद्यार्थी, शिक्षकांनी या प्रदर्शनाला शुक्रवारी भेट दिली. हे प्रदर्शन २२ जूनपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत विनामूल्य खुले राहणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exhibition of educational tools organized at khashaba jadhav sports complex savitribai phule pune university pune print news ccp 14 amy
Show comments