देशाच्या स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यापीठ वारसा सहल समितीतर्फे स्वातंत्र्यपूर्व संस्थानांमधील दुर्मीळ मुद्रांकांचे प्रदर्शन १३ आणि १५ ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत आयोजित करण्यात आले आहे. जयसिंगपूर येथील इतिहासप्रेमी संग्राहक राजकुमार खुरपे यांच्या संग्रहातील मुद्रांक प्रदर्शनात मांडले जाणार असून, फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये गेलेल्या दोन संस्थांनांचे, हरणाच्या कातड्यावर छापलेले मुद्रांक असे काही महत्त्वपूर्ण मुद्रांक प्रदर्शनात पाहता येतील.

विद्यापीठाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रदर्शनाबाबत माहिती दिली. राज्याचे मुद्रांक नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते १३ ऑगस्टला सकाळी साडेदहा वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. विविध दोनशे संस्थानांतील सुमारे दीड हजार मुद्रांकांचा संग्रह राजकुमार खुरपे यांनी केला आहे. तसेच त्यांनी विद्यापीठाच्या इतिहास विभागातील अभ्यासकांसाठी १०१ मुद्रांक भेट दिले आहेत. प्रदर्शनात मुद्रांकांची माहिती खुरपे सांगतील. हे प्रदर्शन विनामूल्य पाहता येईल. तसेच १३ ऑगस्टला विद्यापीठाच्या मुख्य इमारतीची वारसा सहल सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख प्रा. श्रद्धा कुंभोजकर म्हणाल्या, की राज्यकर्त्यांची वैशिष्ट्ये स्पष्ट करणारे असे मुद्रांक संस्थानांतर्फे छापले जात. संस्थानांमधल्या प्रजाजनांनी कोणतेही करार केले, वस्तू विकल्या, खरेदी केल्या, गहाण ठेवल्यास त्याची नोंद मुद्रांकांवर होत असे. त्यामुळे आधुनिक भारतीय इतिहास समजून घेण्यासाठी मुद्रांक हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे.

Story img Loader