पुणे : ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या दुर्मीळ चित्रकृतींचे प्रदर्शन शनिवारपासून (१६ जुलै) रसिकांना पाहता येणार आहे. रवी परांजपे फाउंडेशनतर्फे आयोजित या प्रदर्शनातून परांजपे यांच्या सहा दशकांहून अधिक काळच्या कला कारकिर्दीचा आढावा घेतला जाणार असून त्यांना आदरांजली म्हणून हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
माॅडेल काॅलनी येथील रवी परांजपे स्टुडिओ येथे १६ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. २२ जुलैपर्यंत दररोज सकाळी अकरा ते सायंकाळी सात या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार असून परांजपे यांच्या मूळ निवडक कलाकृती आणि कॅनव्हासवरील चित्रप्रतिकृती पुणेकरांना खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रदर्शनाच्यानिमित्ताने २३ आणि २४ जुलै रोजी प्रथितयश कलाकार त्यांच्या कलेच्या प्रात्यक्षिकाद्वारे रवी परांजपे यांना आदरांजली वाहणार आहेत. यामध्ये २३ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता गोपाळ नांदुरकर आणि दुपारी तीन वाजता मोहन खरे तर, २४ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता मिलिंद मुळीक या चित्रकारांचा समावेश आहे. याच दिवशी दुपारी तीन वाजता अभिजित धोंडफळे शिल्पकृती साकारणार आहेत.