चरित्र, काव्य, व्याकरण, नियतकालिके, नाटके आणि इतिहासविषयक अशा १८१८ ते १९३० या कालखंडातील चारशेहून अधिक दुर्मिळ ग्रंथांसह नियतकालिकांचा खजिना शनिवारी खुला झाला.
महाराष्ट्र साहित्य परिषद आणि जनवाणी यांच्यातर्फे वारसा सप्ताहांतर्गत जागतिक ग्रंथदिनाचे औचित्य साधून भरविण्यात आलेल्या दुर्मिळ ग्रंथ आणि नियतकालिकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ समीक्षक प्रा. के. रं. शिरवाडकर यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी, परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, कोशाध्यक्ष सुनील महाजन, कार्यवाह महेंद्र मुंजाळ, साहित्य महामंडळाच्या विश्वस्त डॉ. कल्याणी दिवेकर आणि जनवाणी संस्थेच्या प्राजक्ता पणशीकर याप्रसंगी उपस्थित होत्या. परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृह येथे रविवारी (२१ एप्रिल) सकाळी दहा ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे.
 स्वामी रामतीर्थ, एकनाथमहाराज, नानासाहेब पेशवे, र. धों. कर्वे यांचे चरित्र, मोरोपंतांची केकावली, पद्मरत्नावली, करण कौमुदी हे कवितांचे संग्रह, तर्खडकर यांचे मराठी भाषेचे व्याकरण, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे मराठी व्याकरणावरील निबंध, सुलभ मराठी व्याकरण, मराठी भाषेचे वाक्प्रचार आणि म्हणी, अर्थालंकाराचे निरुपण, शास्त्रीय मराठी व्याकरण, विविधज्ञानविस्तार, केरळ कोकिळ, बालबोध, मासिक मनोरंजन यांसह १९८० नंतरची विविध नियतकालिके, मृच्छकटिक, संगीत सौंदर्यलहरी, सरोजिनी, संगीत रत्नावली ही जुनी नाटके याखेरीज फ्रेंच आणि जर्मन लोकांच्या लढाईचा इतिहास, अयोध्येचे नबाब, जगाच्या इतिहासाचे सामान्य निरुपण, भोपाळ संस्थानचा इतिहास, मराठय़ांची बखर, भोर संस्थानचा इतिहास, मराठय़ांच्या इतिहासाची साधने, ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम आणि चारित्र्य आणि माझा प्रवास ही इतिहासविषयक दुर्मिळ पुस्तके या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत.