खोडद येथील जगातील सर्वात मोठय़ा रेडिओ दुर्बिणीच्या (जीएमआरटी ) साहाय्याने सूर्य आणि पल्सारचे निरीक्षण करण्याची सुवर्णसंधी नागरिकांना मिळणार आहे. विज्ञानाचे गमतीशीर प्रयोग, प्रकल्प आणि वैज्ञानिकांची व्याख्याने याचा आनंदही या वेळी घेता येईल.
‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रीसर्च’ च्या वतीने जीएमआरटी खोडद येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी विज्ञान दिनानिमित्त भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे वर्ष देशातील रेडिओ खगोलशास्त्राचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने या प्रदर्शनाला विशेष महत्त्व असल्याचे संस्थेने कळविले आहे.
सूर्य आणि पल्सारचे जीएमआरटीद्वारे निरीक्षण, या दुर्बिणीच्या कामकाजाची माहिती घेत प्रत्यक्ष शास्त्रज्ञांकडून शंकानिरसन करून घेणे, बलूनचे उड्डाण, मंगळावरील बग्गीची व ‘प्रथम’ उपग्रहाची प्रतिकृती, माणसांच्या हालचालींचा वेध घेणाऱ्या रोबो, सौर ऊर्जेवर चालणारी नौका आणि हवेच्या दाबावर चालणारी मोटार ही या प्रदर्शनाची आकर्षणे ठरणार आहेत. गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष अरुण निगवेकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येईल. प्रा. गोविंद स्वरूप, प्रा. एस. के. घोष, प्रा. गोपालकृष्ण या वेळी उपस्थित राहणार आहेत.
हे प्रदर्शन पाहू इच्छिणाऱ्यांसाठी शिवाजीनगरहून नारायणगाव आणि तिथून पुढे खोडदला येण्यासाठी एसटीची सोय उपलब्ध आहे. प्रदर्शनस्थळी पिण्याचे पाणी व प्राथमिक वैद्यकीय सुविधांची सोय संस्थेतर्फे करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी ०२१३२२५२११२/ २५८३००/ २५८४०० या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा