स्थानिक पक्ष्यांची संख्या कमी होत असताना उजनी जलाशयावर मात्र पक्ष्यांचे संमेलन भरले आहे. उजनी जलाशयावर येणाऱ्या परदेशी पक्ष्यांच्या संख्येत यंदा चांगली वाढ झाल्यामुळे पर्यटक आणि पक्षिप्रेमी खूश आहेत.
उजनी जलाशयावर देशोदेशींच्या सीमा पार करून आलेल्या पाहुण्या पक्ष्यांचे संमेलन भरल्याचे चित्र असल्यामुळे पक्षिमित्रांची पावले उजनी जलाशयाकडे वळू लागली आहेत. यंदा उजनी जलाशयाकडे अत्यंत दुर्मिळ आणि क्वचितच जे पक्षी दिसतात असे पक्षी दिसत असल्यामुळे उजनी जलाशयाची भेट पर्यटकांसाठी आनंदाची ठरत आहे. हिवाळ्यात परदेशी पक्ष्यांच्या संख्येत उजनी जलाशयावर मोठी वाढ होत असताना स्थानिक पक्ष्यांची संख्या मात्र कमी होत असल्याकडेही निसर्गप्रेमी लक्ष वेधत आहेत. यंदा उजनी धरणात पाणीसाठा कमी असल्याने दलदल आणि पाणथळीच्या जागा अधिक प्रमाणात तयार झाल्याने पाहुण्या पक्ष्यांची चंगळ झाली आहे. त्यामुळे अनेकविध जाती-प्रजातींच्या पक्ष्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे अनुमान पक्षी मित्रांकडून व्यक्त होत आहे. उजनीत काही दुर्मिळ पक्षी आढळून आल्याचे पक्षी मित्र प्रा. हनुमंत काळे आणि अजिंक्य घोगरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
दरवर्षी उजनी जलाशयावर फ्लेिमगो (रोहित), चित्रबलाक (पेंटेड स्टॉर्क) न चुकता येतात. फ्लेिमगो हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते. त्या बरोबरच अन्य चाळीस-पन्नास जाती प्रजातींचे पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून आले आहेत. पर्यटकांचे लक्ष फ्लेिमगोंकडेच प्रामुख्याने असते. त्यांचे इतर पक्ष्यांकडे दुर्लक्ष होत असले तरी पक्षिमित्रांच्या नजरेतून हे पक्षी सुटलेले नाहीत. युरोप खंडातील कडाक्याची थंडी टाळण्यासाठी हे पक्षी आशियाई देशांकडे वळतात. भारतात महाराष्ट्रातील उजनी धरण त्यांचे हक्काचे घर झाले आहे.
अनेक प्रकारचे पक्षी येथे विणीच्या हंगामासाठी येतात. त्यांची वसाहतीची स्थळेही ठरलेली आहेत. सध्या कुंभारगाव, डिकसळ, काळेवाडी, पळसदेव, कांदलगाव येथील पाणलोट क्षेत्रातील गावांलगत या पक्ष्यांचा अधिवास आहे.
या वर्षी युरेशियन कुरव उजनी येथे आढळून येत आहे. त्याचबरोबर कंठेरी चिखल्या (लिटिल िरग प्लोवर), शेकाटय़ा (ब्लॅक िवग्ड स्टिल्ट), तपकिरी डोक्याचा कुरव (ब्राऊन हेडेड गल), उघडचोच करकोचा किंवा मुग्धबलाक (एशियन ओपन बिल स्टॉर्क), थापटय़ा (नॉर्दन शोवलर), राखी बगळा (ग्रे हेरॉन) आदी जाती प्रजातींचे पक्षी पाणथळ व पाणगवतांच्या जागा अशी त्यांच्या पसंतीची स्थळे शोधत उजनी जलाशयावरील पाहुणचार घेत आहेत. काही पक्षी निरीक्षकांच्या मते हवामानातील व तापमानातील बदल आणि अन्य कारणांमुळे पक्ष्यांच्या स्थलांतरात वाढ होण्याची शक्यता आहे आणि असे पक्षी त्यांना योग्य व अनुकूल वाटेल त्या ठिकाणी कायमस्वरूपी वास्तव्य करण्याचीही शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा