पुणे : राज्यातून होणाऱ्या सॉफ्टवेअर निर्यातीत पुणे आणि मुंबईचा वाटा कायम सर्वाधिक राहिला आहे. आता इतर शहरांतही माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राचा विस्तार होऊ लागला असून, त्यांच्या सॉफ्टवेअर निर्यातीत सातत्यपूर्ण वाढ दिसून येत आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यातील काही शहरांत सॉफ्टवेअर निर्यातीत ५० टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविण्यात आली आहे.
देशातील सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कमधून (एसटीपी) होणाऱ्या सॉफ्टवेअर निर्यातीची आकडेवारी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत नुकतीच मांडली. या आकडेवारीनुसार, राज्यातील सॉफ्टवेअर निर्यातीत पुण्याचे अव्वल स्थान कायम असून, पुणे दुसऱ्या स्थानी आहे. याच वेळी राज्यातील नागपूर, नाशिक, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांनीही चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे पुणे आणि मुंबईबाहेर हळूहळू आयटी क्षेत्राचा विस्तार होऊन ती रूजत असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा – पिंपरी : पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न मिटणार; ‘या’ ठिकाणची मिळाली १५ एकर जागा
गेल्या पाच वर्षांचा विचार करता राज्यातील काही शहरांमधील सॉफ्टवेअर निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. नागपूरमधून आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये ४०५ कोटी रुपयांची सॉफ्टवेअर निर्यात झाली होती. ती पाच वर्षांत ५० टक्क्यांहून अधिक वाढून २०२३-२४ मध्ये ६४६ कोटी रुपयांवर पोहोचली. नाशिकमधून २०१९-२० मध्ये २१० कोटी रुपयांची सॉफ्टवेअर निर्यात झाली होती. ती पाच वर्षांत अडीच पटींनी वाढून ४९५ कोटी रुपयांवर पोहोचली. कोल्हापूरमधून २०१९-२० मध्ये १२८ कोटी रुपयांची सॉफ्टवेअर निर्यात झाली होती आणि ती २०२३-२४ मध्ये ५० टक्क्यांनी वाढून १८९ कोटी रुपयांवर पोहोचली. छत्रपती संभाजीनगरमध्ये २०१९-२० मध्ये सॉफ्टवेअर निर्यात ७२.८५ कोटी रुपये होती आणि ती २०२३-२४ मध्ये जवळपास दुपटीने वाढून १३२ कोटी रुपयांवर पोहोचली.
राज्यात पुणे, मुंबई सोडून इतर शहरांत आयटी क्षेत्राचा विस्तार होताना दिसत आहे. मात्र, हे प्रमाण अतिशय कमी आहे. छोट्या शहरांत आयटी क्षेत्राचा विस्तार व्हावा यासाठी केवळ जमीन देऊन उपयोग नाही, तर मोठ्या प्रमाणात प्रोत्साहनपर सवलती द्याव्या लागतील. याचबरोबर या उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे लागेल. त्यातून आयटी क्षेत्राचे राज्यात विकेंद्रीकरण शक्य होईल. – डॉ. दीपक शिकारपूर, संगणकतज्ज्ञ
छोट्या शहरांमध्ये आयटी सेवा क्षेत्रातील कंपन्या सध्या पोहोचताना दिसत आहेत. राज्यातील अशा शहरांमध्ये स्थानिक गुणवत्ता असून, त्यांचा वापर भविष्यात तिथेच होऊ शकेल. जगभरात गुणवत्ता असेल तिथे आयटी क्षेत्राचा विस्तार झाल्याचा पाहायला मिळते. छोट्या शहरातील जीवनमानाचा दर्जा उंचावला असून, तिथे सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. अशा ठिकाणी राहणे मनुष्यबळासाठीही सोयीचे ठरत आहे. – के.एस. प्रशांत, माजी अध्यक्ष, सॉफ्टवेअर एक्सपोर्टर्स असोसिएशन ऑफ पुणे (सीप)