पुणे : पुणे, शिरूर लोकसभा मतदार संघांसाठी सोमवारी (१३ मे) मतदान पार पडले. या निवडणुकीसाठी सर्वाधिक ७४ लाख ९७ हजार रुपये प्रचार खर्च हा शिरूरचे महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी केला आहे. त्याखालोखाल पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी ६९ लाख ४१ हजार रुपये खर्च केला आहे. शिरूरचे महाआघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी ५३ लाख ६९ हजार, तर पुण्याचे महाआघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी ४६ लाख ४३ हजार रुपये प्रचारावर खर्च केला आहे. या चारही उमेदवारांच्या प्रचार खर्चात तफावत येत असल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून तिसरी नोटीस बजावण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे, शिरूर मतदार संघांतील उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची तीन वेळा तपासणी करण्यात आली. पहिली तपासणी ३ मे, दुसरी ७ मे, तर तिसरी तपासणी ११ मे रोजी करण्यात आली. या तिन्ही तपासणीत शिरूरमधील आढळराव, कोल्हे आणि पुण्याचे मोहोळ, धंगेकर यांच्या प्रचार खर्चात तफावत आढळली होती. त्यामुळे शिरूरचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे आणि पुण्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी नोटीस बजावली होती. त्यानंतर या उमेदवारांच्या प्रतिनिधींनी काही खर्च मान्य केला, तर काही खर्च अमान्य केला होता. शेवटच्या खर्च तपासणीत देखील या चौघांच्या निवडणूक प्रतिनिधींनी सादर केलेला खर्च आणि प्रशासनाच्या शॅडो रजिस्टरमधील खर्चात तफावत आली आहे.

हेही वाचा : मावळमध्ये घटलेल्या मताचा कोणाला फटका? नेमके किती झाले मतदान?

दरम्यान, प्रचार खर्चातील तफावतीबाबत आढळराव, कोल्हे, मोहोळ आणि धंगेकर यांना नोटीस बजावण्यात आली असून, त्यावर खुलासा करावा लागणार आहे. खुलासा न केल्यास हा खर्च मान्य असल्याचे समजून संबंधित उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट केला जाणार आहे. तसेच ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यानंतर ३० दिवसांत पुणे, शिरूर लोकसभा मतदार संघांच्या खर्च निरीक्षकांसमवेत उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी हजर राहून खर्चातील तफावत दूर करण्यात येणार आहे.

हेही वाचा : पिंपरी : मावळमधील ‘ईव्हीएम’ कुठे ठेवल्या? कशी आहे सुरक्षा व्यवस्था?

उमेदवारांच्या खर्चाचा आढावा

उमेदवार-शॅडो रजिस्टरनुसार- उमेदवारांनुसार-तफावत

शिवाजी आढळराव पाटील ७४,९७,०८६- ३२,६३,९०९- ४२,३३,१७७
अमोल कोल्हे ५३,६९,९२५- ३६,३८,४९१-१७,३१,४३४
मुरलीधर मोहोळ ६९,४१,७१६- १९,५०,३२७-४९,९१,३८९
रवींद्र धंगेकर ४६,४३,५३३- ३२,५६,२५३-१३,८७,२८०

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expenditure review of lok sabha candidates of pune and shirur pune print news psg 17 css