पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरुर परिसरातून महागड्या मोटारींची चोरी करून चेन्नईत विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. चोरट्यांकडून ३० लाख रुपये किमतीच्या चार मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत.
राजा कल्याण सुंदराम, यादवराज शक्तीवेल (दोघे रा. तांबरम, चेन्नई, तामिळनाडू), रवींद्रम गोपीनाथम (रा. वेल्लूर, तामिळनाडू), आर. सुधाकरन (रा. वेंडलूरू, तामिळनाडू) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरुर परिसरातून महागड्या मोटारी चोरीस गेल्या होत्या. या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल करण्यात आले होते. चोरट्यांकडून महागड्या मोटारींची चोरी करण्यात येत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती.
हेही वाचा – नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण? अजित पवारांनी थेटच सांगितलं; म्हणाले…
चोरलेल्या मोटारी नगर रस्त्याने संभाजीनगरकडे गेल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात आढळून आले होते. पोलिसांकडून चोरट्यांचा माग काढण्यात येत होता. चोरलेल्या महागड्या मोटारी तामिळनाडूतील चेन्नईत असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली होती. पोलीस मागावर असल्याची माहिती चोरट्यांना मिळाली होती. आरोपी आर. सुधाकरन याला पोलिसांनी जालना परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरीच्या दहा मोटारींची खरेदी केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने चेन्नईतून आरोपी राजा सुंदरम, यादवराज शक्तीवेल, रवींद्रम गोपीनाथम यांना ताब्यात घेतले.
हेही वाचा – पुणे : मेहुणीच्या घरात चोरी करणारा अटकेत; कोंढवा पोलिसांकडून आठ तोळ्यांचे दागिने जप्त
पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त अधीक्षक मितेश घट्टे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक निरीक्षक महादेव शेलार, उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सचिन घाडगे, तुषार पंधारे, राजू मोमीन, जनार्दन शेळके आदींनी ही कारवाई केली. चोरट्यांनी संगणकीय प्रणालीचा वापर करून मोटारींचे लाॅक उघडल्याचे निष्पन्न झाले आहे. ग्रामीण पोलिसांनी वाहन चोरट्यांना पकडण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. गेल्या महिन्याभरात ग्रामीण पोलिसांनी १२ दुचाकी चोरट्यांना पकडून ५० दुचाकी जप्त केल्या आहेत.