पुणे : कुरिअर कंपनीच्या मालवाहतुकीच्या गाडीतून महागडे मोबाइल संच चोरणाऱ्या चोरट्यांना गुन्हे शाखेने अटक केली. चोरट्यांकडून महागडे मोबाइल संच, आयपाॅड असा तीन लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अभिजीत अरुण जाधव (वय २६, रा. मुकादमवाडी, कुरकुंभ, दौंड), अक्षय संभाजी निंबाळकर (वय २३ रा. मळद, ता. दौंड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सहकारनगर भागात ब्ल्यू डार्ट एक्सप्रेस कुरिअर कंपनीच्या गाडीतून महागडे मोबाइल संच चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली होती. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडून करण्यात येत होता. पद्मावती ट्रॅव्हल्सच्या वाहनतळावर दाेघेजण मोबाइल विक्रीसाठी आले होते. ते खरेदीदारांच्या शोधात असल्याची माहिती पोलीस कर्मचारी पुष्पेन्द्र चव्हाण आणि अमोल सरडे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे मोबाइल संच सापडले.
हेही वाचा – कोथरूडमध्ये दहशत माजवणाऱ्या ओंकार कुडलेविरुद्ध मोक्का कारवाई
हेही वाचा – गृहिणींसाठी आनंदवार्ता, टोमॅटोचे दर घटले! कांदा, लसूणच्या दरात अल्पशी वाढ
पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट दाेनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक वैशाली भोसले, विशाल मोहिते, उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, नितीन कांबळे, गजानन सोनुने, अमोल सरडे, पुष्पेन्द्र चव्हाण, साधना ताम्हाणे, उज्वल मोकाशी, निखिल जाधव, शंकर नेवसे आदींनी ही कामगिरी केली.