पुणे : सध्या मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. यावर रिपीटेटिव्ह ट्रान्सक्रॅनिअल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन (आरटीएमएस) ही उपचारपद्धती परिणामकारक ठरते. परंतु, हे उपचार महागडे असल्याने सर्वसामान्य रुग्णांना परवडत नाहीत. आता येरवड्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णांसाठी ही सुविधा मोफत सुरू झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनोविकारासह चेतासंस्थेशी निगडित आजारांवर आरटीएमएस उपचार प्रभावी ठरतात. या उपचाराचे अत्याधुनिक यंत्र प्रादेशिक मनोरुग्णालयात बसविण्यात आले आहे. या यंत्राद्वारे मानसिक उपचार शुक्रवारपासून सुरु झाले. हे उपचार बाह्यरुग्ण विभागात उपलब्ध असून, त्यासाठी कोणतीही प्राथमिक शारीरिक चाचणी करण्याची आणि भूल देण्याची आवश्यकता नाही. सर्वसाधारणपणे खासगी रुग्णालयात आरटीएमएस उपचाराच्या एका सत्राचा खर्च ६ ते ८ हजार रुपये असतो. यामुळे एका रुग्णाच्या संपूर्ण उपचाराचा खर्च लाखाच्या घरात जातो. प्रादेशिक मनोरुग्णालयात पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडासह इतर ठिकाणांहून मनोरुग्ण उपचारासाठी येतात. आता त्यांना हे उपचार मोफत मिळणार आहेत.

हेही वाचा >>>“…तर सीमेवरील सुरक्षेत वाढ करावी”, सैफ अली खानच्या घटनेनंतर रोहित पवारांचं वक्तव्य

मानसिक आजारांवर उपचार घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे रुग्ण लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी आरोग्य विभागाने मनोरुग्णालयाला अत्याधुनिक यंत्राची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या अद्ययावत यंत्राचे उद्घाटन रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीनिवास कोलोड यांच्या हस्ते झाले. या उपचाराबद्दल वरिष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. संदीप महामुनी यांनी सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमास मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे, अधिपरिचारिका संगीता दुबे, रुग्णालयीन अधिकारी, कर्मचारी, तसेच रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन समाजसेवा अधीक्षक रोहिणी भोसले यांनी केले.

आरटीएमएस उपचाराचा फायदा नैराश्य, चिंता, ताण-तणाव आदी मानसिक आजारावर करता येतो. या उपचारामध्ये मेंदूस चुंबकीय लहरीद्वारे उपचार दिले जातात. आरटीएमएस यंत्राद्वारे उपचार खासगी रुग्णालयात महाग असून प्रादेशिक मनोरुग्णालयात ते रुग्णांना मोफत मिळतील. – श्रीनिवास कोलोड, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय येरवडा

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expensive rtms treatment for mental stress and depression free pune print news stj 05 amy