लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने सिम्बायोसिस संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक येथे देशाची राज्यघटना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल माहिती देण्यासाठी ‘आस्क एआय होलोबॉक्स’ कार्यान्वित केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित या होलोबॉक्सच्या माध्यमातून डॉ. आंबेडकर हे स्वत: संवाद साधत असल्याचा अनुभव घेता येणार असून, हा एआय होलोबॉक्स ३१ मार्चपर्यंत सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत पाहता येणार आहे.

सिम्बायोसिसचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाच्या मानद संचालिका संजीवनी मुजुमदार, सिम्बायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर या वेळी उपस्थित होत्या.

सांस्कृतिक मंत्रालयाने १ ते ३१ मार्च या कालावधीसाठी देशातील सहा ठिकाणी ‘आस्क एआय होलोबॉक्स’ कार्यान्वित केले आहेत. त्यात सिम्बायोसिस संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाचा समावेश आहे. पुण्यातील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना राज्यघटना आणि डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल जाणून घेण्याची ही संधी होलोबॉक्सद्वारे मिळणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटायझेशनच्या मिलाफातून होलोबॉक्सची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे डॉ. आंबेडकर यांच्याशी संवाद साधल्याचा अनुभव मिळू शकतो, असे डॉ. मुजुमदार यांनी सांगितले.

होलोबॉक्सला हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रश्न विचारता येणार आहे. सध्या परीक्षा सुरू असल्याने आणि पुढील महिन्यात डॉ. आंबेडकर यांची जयंती असल्याने होलोबॉक्स आणखी एक महिना सिम्बायोसिसमध्ये ठेवण्याची विनंती केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे केल्याचे डॉ. येरवडेकर यांनी सांगितले.