करोना विषाणू संसर्गामुळे आषाढीची वारी रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, वारीच्या वाटचालीच्या कालावधीत यंदाही पंढरीच्या वाटेची अनुभूती देण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आणि राज्य पालखी सोहळा पत्रकार संघाने पुढाकार घेतला आहे. तरुण प्रवचनकारांकडून सलग १९ दिवस समाजमाध्यमातून श्री ज्ञानेश्वरी ग्रंथावर निरूपण सादर केले जाणार आहे. त्याचप्रमाणे वारीच्या वाटचालीची क्षणचित्रेही पाहता येणार आहेत.
शासनाच्या वतीने केवळ संतांच्या पादुका मोजक्या वारकऱ्यांसमवेत रस्ते किंवा हवाई मार्गाने पंढरीला पाठविण्यात येणार आहेत. सद्य:स्थिती लक्षात घेता संप्रदायातील मंडळींनीही त्यास मान्यता दिली आहे. मात्र, संतांच्या सोबतीने पंढरीची वारी पूर्ण करण्याची अनेकांची इच्छा यंदा अपूर्ण राहणार आहे. या वैष्णवांसह सर्वानाच वारीची अनुभूती देण्यासाठी समाजमाध्यमावरील उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आळंदी संस्थानचे प्रमुख विश्वस्थ अॅड. विकास ढगे-पाटील आणि पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई यांनी या उपक्रमाविषयी माहिती दिली.
ढगे-पाटील म्हणाले, वैष्णवांना आषाढी वारीत चालायला मिळणार नसले, तरी घरात बसून मनाने वारीत सहभागी होता येणार आहे. त्यासाठीच श्री ज्ञानेश्वरी ग्रंथावर निरूपणाचा उपक्रम हाती घेतला आहे. पत्रकार संघाच्या https://m.facebook.com/palkhisohalapatrakarsangh या फेसबुक पेजवर १३ जून, म्हणजेच माउलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यापासून आषाढी एकादशीपर्यंत (१ जुलै) सलग १९ दिवस संध्याकाळी ४ ते ५ या वेळेत निरूपणाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.