लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : रस्ते दुरुस्तीसाठी यापूर्वी विविध प्रयोग केलेल्या महापालिकेने आता नवे तंत्रज्ञान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ‘हाय स्ट्रेंथ पॉलिमर काँक्रिट’चा वापर करण्यात येणार आहे. वेगवेगळे प्रयोग आणि रस्ते दुरुस्तीसाठी दरवर्षी सरासरी ३५० कोटी रुपये खर्च केल्यानंतरही रस्त्यांच्या दुरवस्थेची समस्या कायम राहिल्याने महापालिकेचा ‘पॉलिमर काँक्रिट’चा नवा प्रयोग कितपत यशस्वी ठरणार, याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सततच्या रस्ते खोदाईमुळे शहरातील रस्त्यांची दरवर्षी दुरवस्था होते, ही वस्तुस्थिती आहे. एकच रस्ता विविध कारणांसाठी ठरावीक अंतराने खोदला जातो. त्यामुळे या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेला वर्षभरात मोठा खर्च करावा लागत आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असतानाही शहरातील रस्त्यांवर ३५ हजारांहून अधिक खड्डे पडल्याची कबुली पथ विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती. रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था होत असल्याने गेल्या काही वर्षांपर्यंत रस्ते दुरुस्तीसाठी नवनवीन प्रयोग महापालिकेकडून राबविण्यात आले. मुरूम टाकून रस्ता दुरुस्ती, पेव्हर ब्लॉकद्वारे रस्ता दुरुस्ती, कोल्डमिक्सचा वापर, इमल्शन मिक्स, हॉटमिक्समध्ये प्लास्टिकचा वापर, प्लास्टिक कोटिंग मटेरियल, प्रेशर गाऊंट सिस्टिम अशा वेगवेगळ्या प्रयोगांसाठी महापालिकेने वेगवेगळा खर्च केला. आता हाय स्ट्रे्ंथ पॉलिमर काँक्रिटचा वापर केला जाणार आहे. मुंबई महापालिका आणि पाश्चात्त्य देशात या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, असा दावा महापालिकेच्या पथ विभागाकडून करण्यात आला.

आणखी वाचा-पुणे: नदीपात्रात गणपती विसर्जनाला मनाई; हौदांचा वापर करण्याचे महापालिकेचे आवाहन

पावसाळा सुरू होण्यापूर्वीपर्यंत विविध सेवा पुरविण्यासाठी रस्ते खोदाई केली जाते. त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर किंवा भर पावसातच महापालिकेला रस्ते दुरुस्ती करावी लागले. ऐन पावसाळ्यात केलेले डांबरीकरण किंवा रस्त्यांची डागडुजी निकृष्ट दर्जाची ठरते. या नव्या तंत्रज्ञानामुळे पावसातही रस्ते दुरुस्ती करता येणे शक्य असून ती टिकाऊ राहते. या प्रकारचे तंत्रज्ञान वापरून रस्ता दुरुस्त केल्यानंतर काही तासांतच या रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूकही करता येणे शक्य आहे, असा दावा पथ विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला.

प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग

प्रभात रस्ता आणि भांडारकर रस्त्यावर या तंत्रज्ञानानुसार रस्ते दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच अवजड वाहनांमुळे होणारे परिणाम तपासण्यासाठी जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावरील खड्डे यानुसार बुजविण्यात येणार आहेत. नव्या तंत्रज्ञानाने खड्डे दुरुस्त केल्यानंतर काही दिवसांनी त्याची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर संपूर्ण शहरात या नव्या तंत्रज्ञानानुसार रस्ते दुरुस्ती करण्यात येणार आहे.

आणखी वाचा-“चंद्रकांत दादांना गणरायाने सुबुद्धी देवो, मतदारसंघासाठी…”, आमदार रवींद्र धंगेकरांची गणपती बाप्पांना ‘ही’ मागणी

शहरातील रस्त्यांची लांबी

शहरात एकूण १ हजार ३९८.६५ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. यामध्ये १२ मीटरपेक्षा कमी रुंदीचे ९७०.८६ किलोमीटर, १२ ते १४ मीटर रुंदीचे ३१४ किलोमीटर, २४ ते ३० मीटर रुंदीचे ६०.५४ किलोमीटर, ३० ते ३६ मीटर रुंदीचे २९.९६ किलोमीटर, ३६ ते ६१ मीटर रुंदीचे २३.२९ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा समावेश आहे. यातील डांबरी रस्त्यांची लांबी ९४४.१२ किलोमीटर एवढी तर २१०.३९ किलोमीटर लांबीचे काँक्रीटचे रस्ते आहेत.

या तंत्रज्ञानासंदर्भात विविध कंपन्यांबरोबर चर्चा सुरू झाली आहे. त्यानुसार काम करून देण्याचे आणि महापालिकेला केवळ साहित्य पुरविण्याचे दर पत्रक कंपन्यांकडून मागविण्यात आले आहेत. या तंत्रज्ञानाची प्रायोगिक चाचणी केल्यानंतरच हा प्रयोग राबवायचा की नाही, हा अंतिम निर्णय घेण्यात येईल. -साहेबराव दांडगे, अधीक्षक अभियंता, पथ विभाग, पुणे महापालिका

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Experiment of polymer concrete for road repair in pune city pune print news apk 13 mrj