पुणे : मराठी संगीत नाटकांच्या वैभवी काळाचे तरुण पिढीला दर्शन घडवणारा, तर ज्येष्ठांसाठी स्मरणरंजनाचा अनुभव ठरणारा अनोखा प्रयोग बालगंधर्व संगीतरसिक मंडळातर्फे करण्यात येणार आहे. बालगंधर्वांच्या काळातील नाटकांप्रमाणे भरजरी वस्त्रे, सोन्याचे दागिने, अत्तरे वापरत ‘संगीत स्वयंवर’ या नाटकाचा प्रयोग १५ डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होणार असून, नाट्यप्रयोगानंतर प्रेक्षकांना पुरणपोळीचे जेवणही दिले जाणार आहे.

बालगंधर्व संगीतरसिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर यांनी ही माहिती दिली. मंडळाच्या उपाध्यक्ष अनुराधा राजहंस, कोषाध्यक्ष रवींद्र कुलकर्णी, सचिव अवंती बायस या वेळी उपस्थित होते. कलाद्वयी संस्थेने ‘संगीत स्वयंवर’ची निर्मिती केली आहे. या वैभवी प्रयोगाला केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, रूई युनिव्हर्सलचे मुख्य कार्यकारी अधिकारी नकुल देशपांडे, ‘कोहिनूर’चे प्रमुख कृष्णकुमार गोयल, सनदी लेखापाल विजयकांत कुलकर्णी, उद्योजक श्रीधर प्रभू उपस्थित राहणार आहेत. नाटकात अस्मिता चिंचाळकर, चिन्मय जोगळेकर, वर्षा जोगळेकर, सुदीप सबनीस, अवंती बायस, संजय गोसावी, विजय कुलकर्णी, निरंजन कुलकर्णी यांच्या भूमिका आहेत, तर संजय गोगटे, विद्यानंद देशपांडे संगीतसाथ करणार आहेत. या प्रयोगानिमित्त बालगंधर्वांच्या वंशजांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>मेट्रोची कामे वेगाने पूर्ण करा, पोलीस आयुक्तांची सूचना

साखवळकर म्हणाले, की नटसम्राट बालगंधर्व यांनी १० डिसेंबर १९१६ रोजी ‘संगीत स्वयंवर’ या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगावेळी भरजरी शालू, सोन्याचे दागिने, पॅरीसहून मागवलेली अत्तरे वापरली होती. त्याचेच अनुकरण करत १५ डिसेंबर रोजी ‘संगीत स्वयंवर’च्या या प्रयोगातही भरजरी शालू, शेले, सोन्याचे खरे दागिने, अत्तरे यांचा वापर केला जाणार आहे.

Story img Loader