पुणे : पहिलीतील विद्यार्थ्याला त्रास दिल्याप्रकरणी मुक्तांगण इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांविरुद्ध रॅगिंग कायद्यान्वये गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्याच्या पालकांनी तक्रार दिल्यानंतर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याने मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका महिलेने पर्वती पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मुक्तांगण इंग्लिश मीडियम स्कूलमधील वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांसह, मुख्याध्यापिका अनुपमा गुजराती यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार महिलेचा सहा वर्षांचा मुलगा मुक्तांगण इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पहिलीत आहे. दोन ते तीन दिवसांपासून शाळेतील वरच्या वर्गातील एक विद्यार्थी आणि त्याचे मित्र पहिलीतील मुलाला त्रास देत होते. त्याला चुकीचा पद्धतीने स्पर्श करत होते. या प्रकाराची कोणाला माहिती दिल्यास जीवे मारू, अशी धमकी विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यामुळे मुलगा घाबरला होता, असे तक्रारदार महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.याबाबतची माहिती मुख्याध्यापिका गुजराती यांना देण्यात आली. मात्र, त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे मुलाची आई आणि अन्य पालकांनी सोमवारी शालेय प्रशासनाला जाब विचारला. मुलाच्या आईने याबाबत तक्रार दिल्यानंतर बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो), तसेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंग करण्यास मनाई अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला, असे दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

हेही वाचा >>>आरोग्यमंत्र्यांनी पोलिसांना झापले, पिंपरी- चिंचवडमधील अवैध गॅस रिफिलिंग स्फोटावरून अधिकाऱ्यांना तंबी

शाळा व्यवस्थापन कोणत्याही गैरप्रकारास पाठीशी घालत नाही. विद्यार्थ्याचे हित, सुरक्षा आणि दर्जेदार शिक्षणास प्राधान्य दिले जाते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळेच्या आवारात सुमारे ८० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून असतात. शाळेत घडलेल्या घटनेबाबत मुख्याध्यापिका यांना चौकशी होईपर्यंत निलंबित केले आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.-एस. पी. रेडेकर कार्याध्यक्ष, पुणे विद्यार्थी गृह