पिंपरी : मेफेड्रोन विक्रीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या निगडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके याचे कारनामे उघडकीस येऊ लागले आहेत. एका गुन्ह्यातील सहआरोपीला अटक न करण्यासाठी शेळके याने साडेतीन लाख रुपये मागितल्याची बाब उघड झाली आहे.
शेळके आणि त्याच्या हॉटेलमधील कामगार नमामी शंकर झा याला सांगवी परिसरात मेफेड्रोन अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून आतापर्यंत ४७ किलो १९० ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांकडून चौकशी सुरू असताना उपनिरीक्षक शेळके याचा आणखी एक गुन्हा निदर्शनास आला आहे. एका कंपनीतील लेखा व्यवस्थापक आणि लेखापाल यांनी कंपनीत आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापकाने त्यांच्या विरोधात न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल केला होता. दाखल तक्रारीबाबत न्यायालयाने तपास करण्याचा आदेश दिला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल करण्यात आलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात तपासी अधिकारी म्हणून शेळके याने कोणतेही कागदपत्रे पुरावे प्राप्त केले नाहीत.
हेही वाचा >>>अमित शाहच्या मुलाने हातामध्ये कधी बॅट पकडली नसेल, पण तो क्रिकेट बोर्डवर: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
गुन्ह्याच्या तपासात कंपनीच्या बँक खात्याचे विवरण आणि आरोपीच्या खात्याचे बँक विवरण प्राप्त केले नाही. कोणताही प्राथमिक तपास न करता आरोपीस तत्काळ अटक केली. या दाखल गुन्ह्यातील सहआरोपीचा गुन्ह्यात सहभाग आहे किंवा त्यांच्याविरुद्ध कागदोपत्री पुरावे आहे का, याबाबत अधिक तपास केला नाही. तसेच, सहआरोपीला नाशिक फाटा येथील उड्डाणपुलाखाली बोलावून घेतले. त्यानंतर आरोपीचा मोबाइल काढून घेत अटक न करण्यासाठी त्याच्याकडे साडेतीन लाख रुपयांची मागणी केली. याबाबत संबंधित आरोपीने तक्रार केली होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे समोर आले आहे.
आणखी अडीच किलो मेफेड्रोन जप्त
मेफेड्रोनच्या गुन्ह्यात अटक केलेल्या उपनिरीक्षक शेळके याची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. चौकशी दरम्यान त्याच्या मोटारीत आणखी मेफेड्रोन असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोन किलो ४०० ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन शेळके याच्या मोटारीतून जप्त केले. या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण ४७ किलो १९० ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी दिली.
हेही वाचा >>>मोठी बातमी : प्राणिसंग्रहालयातून पसार झालेला बिबट्याचा अखेर जेरबंद
मेफेड्रोन पडलेल्या ट्रकचा शोध लागेना
एका मोटारचालकाला २६ फेब्रुुवारी रोजी एक पोते रस्त्यावर पडल्याचे दिसले होते. त्याने ते पोते निगडीच्या भक्ती-शक्ती चौकात नाकाबंदीवरील पोलिसांकडे सोपवले. कर्मचाऱ्यांनी ते पोते प्राधिकरण पोलीस चौकीत आणून ठेवले. याबाबत शेळके याला माहिती दिली. पोत्यात मेफेड्रोन असल्याचे लक्षात आल्यावर शेळके याने आपल्या हॉटेलातील कर्मचारी झा याला बोलावून घेतले आणि ग्राहक शोधण्यास सांगितले. त्यानंतर पुढे हा सगळा प्रकार घडला. दरम्यान, पोलिसांनी ‘सीसीटीव्ही’च्या आधारे केलेल्या तपासात मेफेड्रोन पोते एका ट्रकमधून पडल्याचे दिसून येत आहे. त्या ट्रकचा शोध पोलिसांकडून केला जात आहे. पण, अद्याप शोध लागलेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.