लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या मुंबईतील वाशी येथील तीन आणि बारामती (जि. पुणे) येथील एका निर्यात सुविधा केंद्रांवरून यंदाच्या हंगामात विकसित देशांना ५५.८९ कोटी रुपये मूल्याच्या ३३९७ टन आंब्याची निर्यात झाली आहे. पणन मंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, ब्रिटन, युरोपसह आग्नेय आशियातील देशांना कोकणातील हापूस, मराठवाड्यातील केशर आणि कर्नाटकातील बैगनपल्ली या आंब्यांची मोठ्या प्रमाणावर निर्यात झाली.
भारतातून दरवर्षी सरासरी सुमारे २५ हजार टनांपर्यंत आंब्याची निर्यात होते. त्यामध्ये महाराष्ट्रामधील हापूस, केशर, राजापुरी, अन्य राज्यांतून बैगनपल्ली, हिमायत, दशेरी, चौसा आदी जातींचा प्रामुख्याने समावेश असतो. पणन मंडळाच्या वतीने समुद्रमार्गे तसेच हवाईमार्गे निर्यातीसाठीच्या त्या-त्या देशांच्या मागणीनुसार प्रक्रिया करून आंबा निर्यात करण्यासाठी सुविधा केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. परदेशी बाजारपेठेमध्ये अत्यंत चांगल्या पॅकिंगमध्ये एकसारखा आंबा निर्यात करणे आवश्यक असते. त्याचबरोबर आंब्यावर कोणत्याही प्रकारच्या रोग व किडीचा प्रदुर्भाव नसणे, फळांची प्रत चांगली असणे, फळांवर डाग नसणे, ओरखडे नसणे गरजेचे असते.
आणखी वाचा-पालख्यांचे प्रस्थान होताच इंद्रायणीच्या पाण्यावर पुन्हा तवंग, दक्षता पथके अनभिज्ञ
मागील वर्षी पणन मंडळाच्या ३६ कोटी रुपये मूल्याच्या २२०० टन आंब्याची निर्यात झाली होती. यंदा त्यात ११९७ टनांनी वाढ झाली आहे. राज्यांतून विकसित देशांशिवाय दुबई, सौदी अरेबिया, कुवेत, बांग्लादेश येथे आंब्यावर कोणतीही प्रक्रिया न करता आंबा निर्यात होतो. गेल्या वर्षी देशातून सुमारे २० हजार टन आंबा निर्यात झाली होती, त्यात महाराष्ट्राचा वाटा १८,००० टन होता. यंदा देशातून एकूण २५ हजार टन आंब्याची निर्यात होण्याची शक्यता आहे.
विमानमार्गे वाहतुकीचा दर खूप जास्त असताना देखील गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी विकसित देशांना पणन मंडळाच्या सुविधांवरून होणाऱ्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. आंबा उत्पादकांना आता विकसित देशांची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. पूर्वनोंदणी, दर्जेदार उत्पादन आणि पणन मंडळाचा पुढाकार आदी बाबींमुळे भविष्यात निर्यातीत मोठी वाढ होण्यास वाव आहे. -संजय कदम, कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे
आणखी वाचा-पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील मिळकती होणार ‘फ्री होल्ड’; ५ लाख नागरिकांना मिळणार दिलासा
देशनिहाय झालेली निर्यात (आकडे टनांत)
इंग्लंड – १,९५१
अमेरिका – ९६२.९
युरोपीयन युनिअन देश – २५९.१
न्यूझिलंड – १३२.७
जपान – ४६.५१
ऑस्ट्रेलिया – ३८.६७
दक्षिण कोरिया – ५.१
मलेशिया – ०.९१
दक्षिण आफ्रिका – ०.६७