पुणे : कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) २०२२-२३ या आर्थिक वर्षांत २६.७ अब्ज डॉलर्स किंमतीच्या कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्य पदार्थांची निर्यात केली आहे. अपेडाने १३ फेब्रुवारी रोजी ३८ वा वर्धापन दिन साजरा केला. त्या निमित्त अपेडाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, स्थापनेनंतर पहिल्या आर्थिक वर्षांत म्हणजे १९८७-८८ मध्ये अपेडाने ०.६ अब्ज डॉलर्सची निर्यात केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अपेडाच्या निर्यातीत दरवर्षी सरासरी १२ टक्क्यांनी वाढ होत आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये देशातून ५३.१ अब्ज डॉलर्स रुपये किमतीची कृषी निर्यात झाली होती. या निर्यातीत अपेडाचा वाटा सुमारे ५१ टक्के आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२३ या कालावधीत २३ प्रमुख कृषी उत्पादनांपैकी १८ उत्पादनांच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. फळांच्या निर्यातीत २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रक्रियायुक्त भाज्यांच्या निर्यातीत २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. फळांच्या निर्यातीत वेगाने वाढ होत असून, देशातून १११ देशांमध्ये फळांची निर्यात होत आहे.

हेही वाचा : पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं उद्घाटन का नाही? आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण…

निर्यातीत झालेली वाढ

एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या काळात अनेक महत्त्वाच्या उत्पादनांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत निर्यातीत लक्षणीय वाढ नोंदवली आहे. केळी निर्यातीत ६३ टक्के, कडधान्ये (वाळवलेली आणि साले काढलेली) ११० टक्के, अंडी १६० टक्के, केसर १२० टक्के आणि दशहरी आंब्याची निर्यात अनुक्रमे १४० टक्क्यांनी वाढली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Export of agricultural produce increased as per agricultural processed food products export development authority apeda pune print news dbj 20 css