संजय जाधव

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर या हंगामात निर्बंध घातले आहेत. या हंगामातील निर्यातीचा कोटा पूर्ण झाल्याने सध्या साखरेची निर्यात बंद आहे. हे साखरेवरील निर्यात निर्बंध रेल्वेसाठी कडू ठरले आहेत. कारण चालू आर्थिक वर्षात मध्ये रेल्वेच्या पुणे विभागाला यामुळे सुमारे २० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाला आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी मालवाहतुकीतून ४८५ कोटी रुपयांचे उत्पन्नाचे उद्दिष्ट आहे. पुणे विभागाने एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत १७३.९१ कोटी रुपयांचे उद्दिष्ट गाठले आहे. रेल्वेने ऑगस्टपर्यंत निश्चित केलेले उद्दिष्ट १९८.२७ कोटी रुपये होते. रेल्वेने आता गाठलेले उद्दिष्ट हे १२.३ टक्क्याने कमी आहे. रेल्वेला प्रामुख्याने साखरेवरील निर्यात निर्बंधांचा फटका बसला आहे. साखरेची वाहतूक कमी झाल्याने रेल्वेच्या उत्पन्नात घट झाली आहे.

हेही वाचा >>> सहकारी बँकांबाबत रिझर्व्ह बँकेने उचलले मोठे पाऊल

पुणे विभागाला मालवाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नात साखरेचा वाटा ४० टक्के असतो. रेल्वेने मागील आर्थिक वर्षात ऑगस्टपर्यंत ५ लाख २३ हजार ९८४ टन साखरेची वाहतूक केली होती. चालू आर्थिक वर्षात ऑगस्टपर्यंत ही वाहतूक २ लाख ५३ हजार ७०१ टन आहे. मागील आर्थिक वर्षात रेल्वेला ऑगस्टपर्यंत साखर वाहतुकीतून ८९.७८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. चालू आर्थिक वर्षात ऑगस्टपर्यंत हे उत्पन्न ७०.५५ कोटी रुपये आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यात सुमारे २० कोटी रुपयांची घट झाली आहे.

हेही वाचा >>> महिला पोलीस शिपायाला गुंगीचे औषध देऊन बलात्कार; पोलीस शिपायावर गुन्हा

निर्यात निर्बंधामुळे रेल्वेने होणारी साखरेची वाहतूक कमी झाली आहे. त्याचा फटका उत्पन्नाला बसला आहे. याचबरोबर ईशान्य भारतात आता महाराष्ट्राऐवजी उत्तर प्रदेशातून साखर पाठविली जात असल्याने त्याचाही परिणाम होऊन मालवाहतुकीचे उत्पन्न कमी झाले आहे. – डॉ. रामदास भिसे, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Export restrictions on sugar for railways pune print news stj 05 ysh